कसारा लोकल पहाटे 34 मिनिटे आधी सुटणार, शनिवारपासून ‘मरे’चे नवी वेळापत्रक

322

मध्य रेल्वेने आपल्या लोकलच्या वेळापत्रकात शनिवारपासून बदल केला आहे. या वेळापत्रकात एकाही नव्या फेरीचा समावेश केलेला नाही. एकूण 12 लोकलचा विस्तार करण्यात आला असून तीन लोकलचा परळ स्थानकापर्यंत विस्तार झाला आहे. मुख्य मार्गावरील 42 लोकलच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला असून त्या 4 ते 5 मिनिटे मागे पुढे  करण्यात आल्या आहेत. नऊ गाड्यांच्या श्रेणीत बदल केला असून या लोकल सेमी फास्टच्या फास्ट करण्यात आल्या आहेत, तर कसार्‍याहून सुटणारी पहिली लोकल आता पहाटे 4.25 ऐवजी आता 34 मिनिटे आधी म्हणजे पहाटे 3.51 वाजता सुटणार आहे.

13 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून मध्य रेल्वेचे नवीन वेळापत्रक लागू होणार आहे. या वेळापत्रकात एकाही नवीन फेरीचा समावेश करण्यात आला नसला तरी लोकलच्या 42 फेर्‍यांच्या वेळात काहीसा बदल करण्यात आला आहे. त्यात कर्जत, कसारा, अंबरनाथ येथील गाड्यांचा समावेश असून बहुतेक लोकल नॉन पिक अवरच्या आहेत. तीन लोकलचा विस्तार परळपर्यंत केल्याने परळ लोकलच्या संख्येत तीनने वाढ होणार असून परळ लोकलची संख्या 38 होणार आहे. कल्याणवरून सकाळी 6.48 वाजता सुटणारी दादर लोकलचा आता परळपर्यंत विस्तार झाला असून ती स. 8.02 वाजता परळला पोहचेल. टिटवाळय़ाहून स. 9.54 वाजता सुटणारी ठाणे लोकल आता परळपर्यंत धावणार असून ती स. 11.22 वाजता परळला पोहचणार आहे. कल्याणहून स.11.17 वाजता सुटणारी दादर लोकल आता स.11.10 वाजता सुटून तिचा विस्तारही परळपर्यंत होऊन ती दुपारी 12.22 वाजता परळला पोहचणार आहे. मध्य रेल्वेच्या एकूण लोकल फेर्‍यांची संख्या 1774 असून ती तेवढीच राहणार आहे.

कामगारांसाठी पहिली कसारा लवकर सुटणार

कर्जतहून सुटणार्‍या पहिल्या लोकलच्या पहाटे 2.35 या वेळेत कोणताही बदल झाला नसला तरी कसार्‍याहून पहाटे 4.25 वा. सुटणारी सीएसएमटी लोकल आता 34 मिनिटे आधी म्हणजे पहाटे 3.51 वाजता कसार्‍याहून सुटून सकाळी 6.30 वाजता सीएसएमटीला पोहणार आहे. पूर्वी ही लोकल सीएसएमटीला स. 7.04 वाजता पोहचायची. त्यामुळे सात वाजताच्या पहिल्या पाळीला पोहचणार्‍या कामगारांची गैरसोय व्हायची. त्यामुळे कसारावासीयांच्या मागणीवरून ती आता 34 मिनिटे लवकर सुटणार आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये वाढ होत असल्याने त्यांच्या वेळात बदल होत असल्याने उपनगरीय लोकलच्या वेळापत्रकात बदल करावा लागतो.

आपली प्रतिक्रिया द्या