
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा आमदारांना अपात्र न ठरवण्याच्या निर्णयाविरुद्ध अजित पवार गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. याचिकेवर बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीतील वाद ‘फूट’ नाही. त्यामुळे दहाव्या परिशिष्टानुसार आमदारांवर अपात्रतेची कारवाई करता येणार नाही, असे स्पष्ट करीत विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील 10 आमदारांनाही पात्र ठरवले. विधानसभा अध्यक्षांचा हा निर्णय बेकायदेशीर घोषित करून रद्द करा, अशी मागणी अजित पवार गटाने याचिकेत केली आहे. याचिकेवर बुधवारी न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होण्याची शक्यता आहे.
विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने याआधीच सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे अजित पवार गटाची याचिका सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीला विलंब करण्याची ही खेळी असू शकते, असे जाणकारांकडून बोलले जात आहे.























































