चांदोली पाणलोटात बुधवारीही अतिवृष्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चांदोली धरण पाणलोटक्षेत्रात बुधवारीही अतिवृष्टी सुरूच राहिली. त्यामुळे चांदोली धरणातून 829 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. गतवर्षीच्या महापुराच्या आठवणी आजही ताज्या असताना, नद्यांची पाणीपातळी वाढल्याने कृष्णा आणि वारणाकाठ पुन्हा धास्तावला आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरणातून एक लाख क्युसेकने विसर्ग सुरूच आहे. दरम्यान, जिह्यात आजही पावसाची रिमझिम सुरू आहे.

धरण पाणलोटक्षेत्रात सलग नवव्या दिवशी धुवाँधार पाऊस होत आहे. चांदोली धरणक्षेत्रात 24 तासांत 65 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठय़ात वाढ सुरूच असल्याने धरणातून 829 क्युसेकने विद्युतगृहातून विसर्ग सुरू आहे. सध्या 20.25 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. जिह्यातही पाऊस सुरू असल्याने कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढत आहे. याशिवाय धरणातून पाणी सोडण्यात आल्याने कृष्णा आणि वारणाकाठ पुन्हा धास्तावला आहे. गतवर्षी आलेल्या महापुरातून अद्यापि बहुतांशी कुटुंबे सावरलेली नाहीत. असे असताना पुन्हा पुराची भीती निर्माण झाली आहे. अलमट्टी धरणात 87 हजार 992 क्युसेकने आवक होत आहे. धरणाच्या पाणीसाठय़ाची क्षमता 123 टीएमसी असून, सध्या 90.12 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. या परिस्थितीत पाटबंधारे विभागाच्या वतीने कर्नाटकातील जलसंपदा विभागाशी संपर्क साधला जात आहे. अलमट्टी धरणातून एक लाख क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे पुराचा धोका कमी होण्यास मदत होईल, असे चित्र आहे.

शिराळा तालुक्यात धुवाँधार पाऊस होत आहे. पलूस, कडेगाव, शिराळा, मिरज आणि वाळवा तालुक्यांत दमदार पाऊस सुरूच आहे. कडेगाव, तसेच खानापूर तालुक्यांतील बहुतांशी गावांमध्ये मध्यम पाऊस झाला. कृष्णा आणि वारणा नदीपात्रात पाण्याची आवक वाढत चालल्याने पाणीपातळीतही झपाटय़ाने वाढ होत आहे. सांगलीतील आयर्विन पुलाची पाणीपातळी बुधवारी संध्याकाळी 21 फुटांवर पोहोचली.

महाबळेश्वर-पाचगणीत मुख्य रस्त्यावर वेण्णा लेकचे पाणी

महाबळेश्वर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची धुवाँधार ‘बॅटिंग’ सुरू असून, येथील प्रसिद्ध वेण्णा लेक तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. तलाव परिसर धुक्यात हरवला असून, या संततधार पावसाने महाबळेश्वर-पाचगणी मुख्य रस्त्यावर बगिचा कॉर्नरनजीक पाणी आल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतूक काही काळ मंदावली. या पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागली. वेण्णा नदी ओसंडून वाहत आल्याने लिंगमळा परिसर जलमय झाला होता.