वादळी पावसाचा फटका, चंद्रपुरात पुरातन गरूड स्तभांचा कळस कोसळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसापासून अवकाळी पाऊस बरसत आहे. अवकाळी पावसाने जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. या वादळी पावसाच्या फटका पुरातन वास्तूलाही बसला आहे. जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव परीसरात वादळी पावसासह गारपीट झाली.

नवरगावातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गांधी चौकातील महादेव व हनुमान मंदिराजवळ शेकडो वर्षापूर्वीचा पुरातन शिल्प असलेला गरूड खांब आहे. या खांबावर देव-देवतांचे शिल्प काढलेले आहे. या 20 ते 25 फूट उंच गरूड खांबाला काही वर्षापूर्वी संरक्षणाकरिता लोखंडी रॉड लावण्यात आले होते. मात्र, वादळी पावसामुळे गरूड खांबांच्या कळसाचा भाग कोसळला.

अतिशय देखणा असलेल्या गरुड खांबाचे मोठे नुकसान झाले. शिंदेवाही तालुक्यातील प्राचीन इतिहासाची साक्ष देत हा खांब उभा आहे. मात्र पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे हा ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर आला आहे.