
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात टेमुर्डा येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये दरोड्याची घटना समोर आली आहे. आज सकाळी या बँकेच्या मागील बाजूस असलेली खिडकी फोडलेली दिसली. त्यामुळे गावकऱ्यांना शंका आली आणि त्यांनी वरोरा पोलिसांना याची माहिती दिली.
पोलिसांनी वेळीच घटनास्थळी गाठून तपासाला सुरुवात केली. लोखंडी ग्रील गॅस कटरच्या साह्याने तोडण्यात आल्याचे दिसून आले. या इमारतीच्या मागच्या बाजूला गॅस सिलिंडर पडून असल्याचे दिसून आले. या दरोड्यात सुमारे सात लाखांची रोकड आणि सोने चोरीला गेल्याची माहिती देण्यात आली. दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी श्वान कामाला लावण्यात आला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून चोरांचा शोध सुरू आहे.


























































