
>> अभिषेक भटपल्लीवार, चंद्रपूर
विकासाचा गुलाल सर्वत्र उधळल्याच्या गोड स्वप्नात असलेल्या सरकारला घोडनकप्पीतील आदिवासी बांधवांचे दुःख दिसणार तरी कसे? सबका साथ, सबका विकास या गगनभेदी नाऱ्याचा ढिगाऱ्याखाली आदिवासींचे हंबरडणं दबून गेलं. चंद्रपूर जिल्हाच्या शेवटचा टोकावर असलेला हा आदिवासी गुडा विकासाच्या प्रतीक्षेत पार थकला आहे.
निजामकालीन वस्ती असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर महाराष्ट्र – तेलंगाना सीमेवरील जिवती तालुक्यातील घोडनकप्पी हे कोलाम आदिवासी समुदायाच असलेले गाव. या गावात जायला ना रस्ता आहे, ना पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे. आरोग्य सुविधेचा विचार न केलेलाच बरा. दळणवळणाचा साधनांचा इथं पुरता दुष्काळ.
घोडनकप्पी गाव दोन भागात विभागले आहे. एक डोंगरावर दुसरा डोंगराच्या खाली. येथे राजगोंड व कोलाम समुदायाची 25 घरे आहेत. साधारणता तीस वर्षापूर्वी या गावात 200 घरे होती. 1991- 1992 साली हा भाग नक्षलग्रस्त असताना घोडणकप्पी गावाला आग लागली. या आगीने गावाची राखरांगोळी केली. या भीषण घटनेत सारं काही हिरावले गेले. ना डोक्यावर छत, ना खायला अन्न अशी अवस्था गावाकऱ्यांची झाली. संसार पुन्हा उभा करण्यासाठी गाव अस्ताव्यस्त झाले. अनेकांनी गाव सोडले. कोण कुठे गेले याचे पुरावेही नाहीत.
1994-1995 ला कोलाम शोध मोहिमेअंतर्गत माजी आमदार वामनराव चटप यांनी गावापासून एक कि.मी. अंतरावर टेकडीवर सोळा घरे येथील कोलाम, आदिवासी बांधवांना बांधून दिली. परिस्थिती इथेच थांबली नाही. टेकडीवर पाण्याची व्यवस्था नसल्याने डोंगराच्या पायथ्याशी एक कि.मी. अंतर खाली उतरून गावाकऱ्यांना तहान भागवावी लागत होती. हाताला काम नाही, पण भुकेला कुठं हे कळायचं. ही भूक शमविण्यासाठी टेकडीवरील घराचे पत्रे, सामान विकून येथील नागरिकांनी मूळ गावात आपले वास्तव्य सुरू केले. जळलेल्या घरांची सांगाडे अजूनही गावात उभे आहेत.
विकासाचा गुलाल सर्वत्र उधळल्याच्या गोड स्वप्नात असलेल्या सरकारला घोडनकप्पीतील आदिवासी बांधवांचे दुःख दिसणार कधी? ‘सबका साथ, सबका विकास’ या गगनभेदी नाऱ्यखाली आदिवासीचे हुंदके दबून गेले. चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेला हा आदिवासी गुडा विकासाच्या प्रतीक्षेत थकला आहे. pic.twitter.com/jII5SVTdi3
— Saamana (@SaamanaOnline) May 9, 2023
घोडनकप्पी या डोंगरावरील गावात पोहोचायला साधा रस्ताही नव्हता. स्वातंत्र्यानंतर यावर्षी पहिल्यांदाच गावात जायला कच्चा रस्ता शासनाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बनविला. मात्र 150 फुटापेक्षा जास्त डोंगराखाली वसलेल्या मुख्य गावात जायला अजूनही रस्ता नाही. डोंगर चढून उतरूनच गावात ये-जा करावी लागते. डोंगरावर इयत्ता चौथीपर्यंत शाळा आहे. मात्र शाळेत जायला रस्ताच नसल्याने पावसाळ्यात मुले शाळेत डोंगर चढून जावू शकत नाही. येथे यंदा सौर उर्जेवर पिण्याच्या पाण्यासाठी टाकी बसवण्यात आली. मात्र या टाकीतील पाणी पोहचत नसल्याचे गावकरी सांगतात. अजूनही गावकरी जुन्या पडक्या विहिरीतील व नाल्यातील पाणी आणूनच तहान भागवतात.
आमच्याकडे कुणाचेही लक्ष नाही. गावात रस्ता नाही. पिण्याचे पाणी नाही. राहायला पक्की घरे नाहीत. खाण्यासाठी पुरेसे अन्न नाही. गावातील कोणी आजारी पडले तर खाटेवर उचलून कोसोदूर डोंगर-दऱ्यातून न्यावे लागते, अशी खंत गावकरी बोलून दाखवितात.




























































