चंद्रपूरमध्ये माकडांचा हैदोस, दोन जणांचा घेतला चावा

सामना प्रतिनिधी। चंद्रपूर

चंद्रपूर शहरातील बाबूपेठच्या सिटी शाळा परिसरात माकडांनी हैदोस घातला असून चवताळलेल्या माकडांनी आज पुन्हा 2 जणांना चावा घेतला. यात जखमी झालेल्या एका महिलेच्या पायाला चार टाके घालण्यात आले आहेत.

या उपद्रवी माकडांनी परिसरातील झाडांवर ठाण मांडलं असून शुक्रवारीही माकडांनी 7-8 नागरिकांवर हल्ला केला. यात अनेकजण जखमी झाले आहेत. ही माकडं घरातून बाहेर पडलेल्या लोकांवर हल्ले चढवले जात आहेत. वनविभागानेही याची गंभीर दखल घेतली असून बचाव पथक तयार केली आहेत. मात्र माकडांना पकडण्यात अजून यश आलेलं नाही. माकडांना गुंगीचे इंजेक्शन देण्याचेही प्रयत्न सुरू आहेत, पण घनदाट झाडामुळं माकडं बंदुकीच्या निशाण्यावर येत नसल्यानं पथकही त्रस्त झालं आहे. माकडांच्या भीतीमुळे घराबाहेर पडण्यास नागरिक धजावत नसल्याने या भागातील रस्ते निर्जन झाले आहेत.