
सामना ऑनलाईन। नारायणपूर
छत्तीसगडमधील नारायणपूर येथे 62 नक्षलवाद्यांनी 51 देशी बनावटीच्या शस्त्रास्त्रांसह बस्तरचे पोलीस महानिरिक्षक विवेकानंद सिन्हा यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. दरम्यान, विधानसभा निवडणुकांआधी नक्षलवाद्यांनी आत्मसर्मपण केल्याने सुरक्षा दलाच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाल्याचे बोलले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून नक्षलवादी या भागात पुन्हा सक्रीय झाले आहेत.काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी छ्त्तीसगड व त्याच्या आजूबाजूच्या परिसरात हल्ले केले होते. लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठीच हे हल्ले करण्यात आले होते. त्यानंतर 27 ऑक्टोबरला नक्षलवाद्यांनी बीजापूर येथे गस्त घालणाऱ्या सीआरपीएफच्या जवानांना लक्ष्य केलं होतं. यावेळी नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भुसूरुंगाच्या स्फोटात 4 जवान शहीद झाले होते. तेव्हापासून सुरक्षा रक्षकांनी नक्षलवाद्यांविरोधात जोरदार मोहिम सुरू केली आहे. 12 नोव्हेंबरला छत्तीसगडमध्ये 18 जागांसाठी मतदान होत आहे. विशेष म्हणजे या सर्व जागा नक्षलग्रस्त भागातील आहेत. यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण आहे.






















































