चौके हायस्कूल इमारत विस्तारीकरणासाठी आमदार वैभव नाईक यांच्या वतीने १० लाखाचा निधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

चौके येथील भ. ता. चव्हाण विद्यालय नूतन इमारत विस्तारीकरण कामाचे भूमीपूजन आमदार वैभव नाईक यांनी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. शाळा विस्तारीकरण कामासाठी आमदार नाईक यांनी १० लाख निधी मंजूर केला आहे.

प्रशालेत भूमीपूजन प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख जि. प. सदस्य हरी खोबरेकर, संस्था उपाध्यक्ष आर. जी. चौकेकर, सचिव जगदिश परब, स्थानिक समिती अध्यक्ष बिजेंद्र गावडे, पालक समिती अध्यक्ष मोहन गावडे, मुख्याध्यापक एन. डी. सावंत, चौके शाखाप्रमुख संजय गावडे, प्रविण लुडबे, गणेश कुडाळकर, किसन मांजरेकर, अजित पार्टे, तातू गावडे, विष्णु चौकेकर, संदेश तळगावकर, शैलेश भोसले, गायत्री चव्हाण आदी मान्यवर, शिवसेना पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या वतीने आमदार वैभव नाईक यांचा पुणेरी पगडी आणि शाल श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले, पूर्वीच्या काळी चौके पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी एकत्र येवून पै पै गोळा करुन शाळेची इमारत उभी केली. त्यावेळी शाळा चालवणं फार कठीण होतं, तरीही त्यावेळच्या संस्था पदाधिकाऱ्यांनी ही जबाबदारी सक्षमपणे पेलली. या संस्थेने माझ्या केलेल्या सन्मानाची आणि माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाची परतफेड म्हणून शाळेच्या इमारत विस्तार कामासाठी १० लाख रुपये निधी २५/१५ योजनेतून मंजूर केले असून लवकरच हे काम सुरू करून ते पुर्ण करण्यात येईल. शहरातील दर्जेदार शैक्षणिक सुविधांमुळे बहुतांशी पालकांना आपल पाल्य शहरात शिकाव अस वाटत असत. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा ओढा शहराकडे असल्याचे दिसून येतो. मात्र शहरांप्रमाणे ग्रामीण भागातील शाळांमध्ये आपण दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्यास मुले पुन्हा ग्रामीण भागात वळतील. यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले.

प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा आमदार नाईक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खोचरे सर यांनी केले तर आभार गावकर सर यांनी मानले.