दोन्ही हात नसलेल्या 20 चित्रकारांचा अनोखा कलाविष्कार, बैठी चाळ बनली आर्ट गॅलरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
exhibition-center

सामना प्रतिनिधी । मुंबई

हाताने कुंचल्याचे फटकारे मारून कॅनव्हासवर रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन आणि त्याचे कौतुक नेहमीच होतं, पण दोन्ही हात नसतानाही कधी ओठांमध्ये किंवा पायाच्या बोटांमध्ये ब्रश पकडून कॅनव्हासवर कल्पनेपलीकडचे विश्व साकारणाऱया देशभरातील 20 चित्रकारांच्या पेंटिंग्जचे प्रदर्शन आणि प्रात्यक्षिकाचे आयोजन भांडुप येथे करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही मोठय़ा वातानुकूलित आलिशान आर्ट गॅलरीत नव्हे तर भांडुपच्या बैठय़ा चाळीत हा कलाविष्कार उद्या, 19 जानेवारी रोजी सायंकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत रसिकांना बघता येईल.

कांजुरमार्ग-भांडुपसारख्या कष्टकरी, चाकरमान्यांच्या वस्तीतील मुलांमध्ये कलासंस्कार रुजावेत यासाठी भगवती चाळीतील तरुण गेली 19 वर्षे चित्रकलेचा उपक्रम राबवत आहेत. यंदाचा उपक्रम श्री गणेश सेवा मंडळाच्या वतीने आणि इंडियन माऊथ ऍण्ड फूट पेंटर्स असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे.

कसे साकारते कलादालन

चाळीतील 10 फूट रुंदी असलेल्या प्रत्येक खोलीचा दरवाजा वगळता उरलेल्या 7 फूट भिंतीवर खिडकी झाकून लाकडी पॅनल्स तयार करून त्यावर चित्र प्रदर्शन आयोजित केले जाते.

कधी ः 19 जानेवारी 2019

वेळ ः संध्याकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत

स्थळ ः भगवती निवास, शिवकृपा नगर, श्री काशिविश्वनाथ मंदिरासमोर, कांजुरगाव, भांडुप (पूर्व), मुंबई.
संपर्क ः 9870202188 / 9619117688.

बंदेनवाज नदाफचे आकर्षण

हिंदुस्थानात एकूण 24 दिव्यांग चित्रकार आहेत. त्यातील चार चित्रकारांचा अलीकडेच मृत्यू झाला. उरलेल्या 20 पैकी 3 कलाकार हे महाराष्ट्रातील आहेत, तसेच एक मुंबईकर आहे. मुंबईकर असलेल्या बंदेनवाज नदाफ या पायाच्या बोटांमध्ये ब्रश पकडून चित्र काढणाऱया दिव्यांग कलाकाराचे थेट प्रात्यक्षिक या प्रदर्शनाचे आकर्षण आहे.