कशेडी घाटात रसायनवाहू टँकर दरीत कोसळला; चालकासह क्लिनर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । खेड

मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात रसायनवाहू टँकर 50 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात चालक व क्लिनर दोघेही जखमी झाले. या अपघातात केबीनमध्येच अडकून पडलेल्या चालकाला चार तासांच्या अथक प्रयत्नाने बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या चालक मुंबईतील भाटीया हॉस्पिटल तर क्लिनर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे.

दिनांक 24 नोव्हेंबर रोजी जगदंबा प्रसाद बन्सराज हा आपल्या ताब्यातील रसायन भरलेला कंटेनर क्रमांक एमएच 06-बीडी-0888 घेऊन रोह्याहून लोटे औद्दोगिक वसाहतीकडे यायला निघाला होता. सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास तो कशेडी घाट उतरत असताना एका वळणावर त्याचा टँकरवरील ताबा सुटला आणि तो टँकर रस्त्याच्या उजव्या बाजुला सुमारे 50 फुट खोल दरीत कोसळला.

या अपघातात चालक जगदंबा प्रसाद बन्सराज आणि क्लिनर सुरेश वेदक हे दोघेही चालक केबीनमध्ये अडकले. अपघातादरम्यान झालेला मोठा आवाज ऐकून आजुबाजूच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान कशेडी टॅप येथील महामार्ग पोलीस हे घटनास्थळी पोहचले. ग्रामस्थांच्या मदतीने जखमींपैकी क्लिनरला बाहेर काढून नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिले. मात्र चालकाचा हात केबीनमध्येच अडकल्याने त्याला बाहेर काढणे कठीण झाले होते.

अपघाताची खबर मिळाल्यानंतर खेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. खेड येथील रेस्कू टिमचे अध्यक्ष बुरहाण टांके आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. मदत ग्रुपचे सदस्यही तात्काळ घटनास्थळी पोहचले. केबीनमध्ये अडकून पडलेल्या चालकाला सुखरुपपणे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. मात्र टँकर हटवल्याशिवाय चालकाला बाहेर काढणे शक्य नव्हते. अखेर बचाव पथकातील सदस्यांनी केबीनचा काही भाग तोडून केबीनमध्ये अडकून पडलेल्या चालकाचा क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढले.

या अपघातात चालकाच्या हाताला फ्रक्चर झाले असून टँकरमधील रसायनच्या वासाने तो गुदमरून गेला आहे. त्याला तात्काळ मुंबई येथील भाटीया रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त टँकरमधील रसायन हे ज्वलनशिल असल्याने या ठिकाणी खेड नगरपालिका अग्नीशमन बंबही तैनात ठेवण्यात आला होता.