दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या… मराठवाड्यातील धरणांचे पाणी पिण्यासाठीच! विभागीय आयुक्तांचे आदेश, धरणातील वीजपंपही जप्त करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाने दडी मारल्यामुळे मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडला, त्यानंतर आभाळात कोरड्या ढगांचीच दाटी बघायला मिळाली. ऑगस्टमध्ये पावसाची ३० टक्के तूट आहे. धरण, पाणवठे अजून जोत्यालाही लागले नाहीत. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी जायकवाडी वगळता मराठवाड्यातील सर्व धरणांचे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

एल निनोचा सर्वाधिक प्रभाव मराठवाड्यावर जाणवत आहे. जुलैमध्ये पहिल्या आठवड्यात बरसून पाऊस गायब झाला, तो अद्याप सप्टेंबरमध्येही उगवलेला नाही. सुरूवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकयांनी सोयाबीन, कापूस, मका, मूग, उडीद आदी खरीप पिकांची पेरणी केली. जमिनीत वरवर असलेल्या ओलीमुळे पिकांची उगवण झाली, परंतु जोम धरण्यासाठी आवश्यक असलेला पाऊस न झाल्यामुळे पिके खुरटली तसेच विविध रोगांनी ग्रासली.

पाऊसच नसल्यामुळे मराठवाड्यातील मांजरा, बिंदुसरा, माकणी, तेरणा, येलदरी, सिद्धेश्वर, सीना कोळेगाव, शिवना, माजलगाव, लोअर दुधना आदी धरणांचे पाणी जोत्यालाही लागले नाही. जायकवाडी धरणात ८० टक्के पाणी साठा झाला, पण तो वरच्या भागातून आलेल्या पाण्यामुळे. जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रातून अतिशय कमी पाणी धरणात आले. त्यामुळे जायकवाडी वगळता इतर सर्व लहान-मोठ्या धरणांतील पाणी पिण्यासाठी राखीव करण्याचे आदेश विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले आहेत. सध्याच्या परिस्थितीत विभागातील ४५० गावे तहानलेली आहेत. या गावांतील नागरिकांना टँकर्सने आणि खासगी विहिरी अधिगृहित धरून पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. आजमितीला ८८ टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे. ज्या ज्या ठिकाणी पाण्याचे स्रोत आहेत, हे सगळे स्रोत पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर कमी पाणी असलेल्या धरणांवर पाणीचोरी रोखण्यासाठी गस्तीपथक नेमण्यात येणार असून धरणातील वीजपंपही बंद ठेवण्याच्या सूचना शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत. वीजपंप बंद न केल्यास ते जप्त करण्यात येतील, असेही जी. श्रीकांत यांनी स्पष्ट केले. सप्टेंबरनंतर कालवा सल्लागार समितीच्या सल्ल्यानुसार पुढील नियोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हवामान खात्याचा अहवाल चिंताजनक

हवामान खात्याने १ जून ते ६ सप्टेंबर या कालावधीत राज्यात पडलेल्या पावसाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात मराठवाड्यात सर्वांत कमी पाऊस झाल्याचे म्हटले आहे. चालू हंगामात मराठवाड्यात पावसाची ३० टक्के तूट आहे. सर्वात कमी पाऊस हिंगोली जिल्हधात पडला आहे. हिंगोलीत सरासरी ६५६ मिमी पाऊस पडायला पाहिजे होता, पण केवळ २४० मिमी पाऊस पडला आहे. ही तूट ४८ टक्के आहे. जालना जिल्हयात ४३ टक्के, परभणीत ३९ टक्के, धाराशिव ३७ टक्के, नदिडात २२ टक्के, लातुरात ३१ टक्के तर छत्रपती संभाजीनगरमध्ये १५ टक्के पावसाची तूट आहे.

धरणांत केवळ ६७.७३ टक्के पाणीसाठा

मराठवाडा विभागात जायकवाडीसह एकूण ११ मोठे प्रकल्प आहेत. विभागात पाऊसच नसल्याने या प्रकल्पांत अपेक्षित पाणीसाठा होऊ शकला नाही. या सगळ्या प्रकल्पांत मिळून ६७ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी हाच पाणीसाठा ९५ टक्के होता. मांजरा, तेरणासह सीना कोळेगाव हे मोठे प्रकल्प तळाशी गेले आहेत.

मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठा

जायकवाड़ी- ८९.१७
निम्न दुधना – २२.४९
येलदरी – ६२.५२
सिध्देश्वर – ३५.०६
माजलगाय – २५.९०
मांजरा – १२.२६
पेनगंगा – ६८.९३
मानार – ६१.४४
निम्न तेरणा – २४.२७
विष्णूपुरी – ९४.२३
सौना कोळेगाव – ००.००
एकूण – ६७,७३