सेन्सॉरने अडवलेले छावणी रंगमंचावर; नाटककार प्रेमानंद गज्वी यांचा अमृत महोत्सव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध नाटकाकर प्रेमानंद गज्वी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त  त्यांचे ‘छावणी’ नाटक रंगमंचावर येणार आहे. सात वर्षांपूर्वी ‘छावणी’ नाटक सेन्सॉरच्या कचाटय़ात सापडले होते. या नाटकाला घटनाविरोधी ठरवून सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र नाकारले होते. बऱयाच संघर्षानंतर ‘छावणी’ला प्रमाणपत्र मिळाले. आता अनेक वर्षांनी हे नाटक रंगमंचावर सादर होणार आहे. थिएटर ऑफ रेलेवन्सतर्फे या नाटकाचे तीन प्रयोग येत्या 15 जून रोजी शिवाजी मंदिर, दादर येथे होणार आहेत.

99 व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी शोषणाविरोधात लिहिणारे नाटककार आहेत. त्यांची ‘किरवंत’, ‘गांधी – आंबेडकर’, ‘तन-माजोरी, ‘घोटभर पाणी’ ही नाटके अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. त्यांचे अन्य भाषेत अनुवाद झाले आहेत. त्यांनी सात वर्षांपूर्वी ‘छावणी’ नाटकाची संहिता मराठी रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाकडे पाठवली होती. मात्र हे नाटक घटनाविरोधी ठरवून सेन्सॉर बोर्डाने नाकारले. नाटकाच्या प्रयोगाची परवानगी देऊ शकत नाही. हवे असल्यास कोर्टाकडून घ्या, असे गज्वी यांना सांगण्यात आले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीबाबत माध्यमांनी आवाज उठवल्यावर नाटकाला परवानगी देण्यात आली, मात्र नाटकावरून वाद निर्माण झाल्याने एकही निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकार नाटक रंगभूमीवर आणण्याचे धाडस करत नव्हते. अखेर ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’चे प्रणेते, सर्जनशील दिग्दर्शक मंजुल भारद्वाज यांनी ‘छावणी’ नाटक रंगमंचावर आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

15 जून रोजी शिवाजी मंदिर येथे सकाळी 11, दुपारी 4 आणि रात्री 7.30 वाजता ‘छावणी’चे प्रयोग होणार आहेत. अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के, प्रियांका कांबळे, सुरेखा साळुंखे यांच्या भूमिका आहेत.

स्वातंत्र्यापासून गरिबी गेली नाही. गरीब स्वतःच्या पायावर उभे राहतील अशी व्यवस्था नाही. सामान्यांना न्याय मिळत नाही. या विषयावरील  ‘छावणी’सारखे नाटक इतकी वर्षे रंगभूमीवर येऊ शकले नाही हे दुर्दैव. नाटक व्यावसायिक, कौटुंबिक आणि मनोरंजनात्मक नाटकाच्या पठडीतील नसल्याने ते सादर करण्याचे धाडस कुणी केले नव्हते. आजच्या काळात कुणीतरी हे धाडस केले त्याचा आनंद आहे.
– प्रेमानंद गज्वी