
देशाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी गेल्या साठ वर्षांपासून लागू असलेल्या काही नियमांना बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबत आता सर्वोच्च न्यायालयात जमादार पदावर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांना आता जमादार ऐवजी पर्यवेक्षक (सुपरवायजर) असं म्हटलं जाणार आहे. विशेष म्हणजे न्यायालयात काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांनाही हा नियम लागू होणार आहे. शनिवारी या बदलाविषयीच्या अधिसूचना जारी करण्यात आल्या आहेत.
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारी आणि कर्मचारी नियम 1961मध्ये बदल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार हे बदल होणार आहेत. यात जमादार हा शब्द आहे. न्यायालयात सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जमादार म्हणतात. आता हा शब्द बदलून सुपरवायजर म्हणजेच पर्यवेक्षक असा शब्द रुढ करण्यात येणार आहे.
याखेरीज वकिली करणाऱ्यांनी फक्त खटला लढवण्याच्या दृष्टीनेच नव्हे तर मध्यस्थ म्हणून काम केल्यास अनेक प्रकरणांमधला न्यायालयांवरचा भार कमी होऊ शकेल, असं सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे. तसंच, सरकारने एका मित्रासारखी वागणूक ठेवायला हवी, असंही सरन्यायाधीश म्हणाले आहेत.

























































