
मी पुन्हा येईन असे म्हणणाऱया देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने ते नाखूश आहेत. सरकारी कार्यक्रमातील त्यांच्या बॉडीलँग्वेजवरून ते प्रकर्षाने दिसून येते. उपमुख्यमंत्री करून मला दिल्लीतील नेत्यांनी सरप्राईज गिफ्ट दिले, असे म्हणत फडणवीस यांनी आज एका जाहीर कार्यक्रमात पुन्हा मुख्यमंत्री होता आले नाही याबद्दलची खदखद बोलून दाखवली.
राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये फडणवीस यांना मुख्यमंत्री न केल्याने भाजपमध्ये अस्वस्थता आहे. मुंबई व महाराष्ट्रात अलीकडेच फडणवीसांच्या स्वागतानिमित्त झालेल्या कार्यक्रमांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो बॅनरवरून गायब केल्याने फडणवीस समर्थकांत केंद्रीय नेतृत्वाबाबत प्रचंड नाराजी असल्याचे दिसून आले होते. मात्र आज खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अभीष्टचिंतन सोहळय़ाच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्रीऐवजी मला आमच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री करून सरप्राईज गिफ्ट दिले, असे म्हणत नाराजी व्यक्त केली.
भाजप-शिवसेना युती सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात कायदा केला. त्यासाठी उच्च न्यायलयात लढलो, तामीळनाडूनंतर मुंबई उच्च न्यायालयाने आरक्षण दिले, पण महाविकास आघाडी सरकारने पुढे काहीच केले नाही. आज अवघड मार्ग आहे, पण त्यातूनही मार्ग काढून आपण पुढे जाऊ, असे सांगत फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत मेटे यांना आश्वस्त केले.
मेटेंना मंत्रीपदाचे गाजर
फडणवीस म्हणाले, माझ्या नेत्यांनी मला सरप्राईज गिफ्ट दिले आणि सांगितले तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा म्हणून मी सत्तेत आलो. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. राजकारणातील गिफ्ट हे घोषित केल जात नाही, ते सरप्राईज असते आणि योग्यवेळी ते तुम्हाला मिळणार, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटे यांना पुन्हा एकदा मंत्रीपदाचे गाजर दाखवले.


























































