मनोज सौनिक यांना सहा महिन्यांची मुदतवाढ; केंद्राकडे पाठवला प्रस्ताव

राज्याचे विद्यमान मुख्य सचिव मनोज सौनिक यांना सहा महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला. यापूर्वी किमान आठ मुख्य सचिवांना मुदतवाढ मिळाली आहे. त्याच धर्तीवर मनोज सौनिक यांच्या मुदतवाढीचा मार्ग मोकळा होईल असे सूत्रांनी सांगितले.

सौनिक 31 डिसेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला आहे. पुढील दोन दिवसांत केंद्राकडून या मुदतवाढीला हिरवा कंदील मिळेल असे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. मनोज सौनिक याच्यानंतर सेवाज्येष्ठतेत त्यांच्या पत्नी सुजाता सौनिक यांचा क्रमांक आहे. पण नितीन करीर हेही स्पर्धेत आहेत. मुख्य सचिवांना साधारणपणे तीन ते सहा महिन्यांची मुदतवाढ दिली जाते.