
चीनने पुन्हा एकदा हिंदुस्थानला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. सहा वर्षांपूर्वी चिनी सैनिकांसोबत गलवान खोऱ्यात संघर्ष झालेल्या ठिकाणापासून जवळच चीनने युद्धसराव केल्याचे उघड झाले आहे. हिंदुस्थान-चीन सीमेपासून हे ठिकाण फक्त 60 किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती असून या ठिकाणी अत्याधुनिक शस्त्र व तंत्रज्ञानाचा सरावात वापर करण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार चिनी सैन्याच्या चौथ्या मोटराईज्ड इप्रंट्री डिव्हिजनने हा युद्धसराव केला. ही रेजिमेंट तिबेटमधील शिनजियांगमधील अक्सू प्रांतात तैनात आहे. या भागातील डोंगराळ आणि खडबडीत भूभागासाठी विशेषतः तयार करण्यात आलेल्या स्वयंचलित तोफांचा वापर चिनी सैन्याने या सरावात केला. चीनने प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ मोठय़ा प्रमाणावर लष्करी पायाभूत सुविधा उभारल्या आहेत. पॅगाँग सरोवराजवळ चीनने एक पूलदेखील बांधला असून यामुळे प्रत्यक्ष युद्धकाळात सैन्य हलविण्यास मदत होणार आहे. त्याच सीमेजवळ हा युद्धसराव करण्यात आला आहे. यासंदर्भात हिंदुस्थानकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
रणगाडाविरोधी तंत्रज्ञानासह हवाई सुरक्षा यंत्रणेचाही वापर
चीनने युद्धसरावात अनेक अद्ययावत यंत्रणांचा वापर केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पीएचएल-11 रॉकेट लाँचर, मल्टिपल लाँच रॉकेट यंत्रणा, एचक्यू-17 श्रेणीतील टॅक्टिकल एअर डिफेन्स यंत्रणेचा वापर करण्यात आला. रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांचा सरावात विशेष वापर करण्यात आला. त्यात शत्रूचे रणगाडे आणि चिलखती वाहनांना उद्ध्वस्त करण्याची क्षमता आहे.





























































