जहाज दुर्घटना: शोधकार्यासाठी चीनने मदत मागताच हिंदुस्थनच्या नौदलाने पाठवली विमाने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन दिवसांपूर्वी चीनचे मासेमारी करणारे जहाज समुद्रात बुडाले होते. या जहाजावर 39 लोक होते. मात्र त्यांचा अद्याप शोध लागू शकलेला नाही. त्यानंतर आता या सर्च ऑपरेशन साठी चीनने हिंदुस्थानकडे मदत मागितली आहे. चीनच्या विनंतीवरून हिंदुस्थानच्या नौदलाने 17 मे रोजी जहाज शोधण्यासाठी ऑपरेशन सुरू केले. चिनी जहाजाच्या हिंदी महासागरातील शोधकार्यासाठी नौदलाने विमाने पाठवली आहेत.

जहाजावरील 39 लोकांना वाचवण्यासाठी चीनने हिंदुस्थानशिवाय इतर अनेक देशांचीही मदत मागितली आहे. बुडालेल्या जहाजात 17 चिनी क्रू मेंबर्स, 17 इंडोनेशियन आणि फिलीपिन्समधील पाच लोकांचा समावेश आहे. हे जहाज मंगळवारी हिंदी महासागराच्या मध्यवर्ती भागात बुडाले. चिनी नौदलाच्या विनंतीनुसार, हिंदुस्थानच्या नौदलाने 17 मे रोजी हिंदुस्थानपासून सुमारे 900 सागरी मैल दूर असलेल्या दक्षिण हिंदी महासागर क्षेत्रात P-8I विमान तैनात केले आहे. समुद्रात बुडालेल्या चिनी जहाजाचे नाव लू पेंग युआन यू 028 असे सांगण्यात येत आहे.

नौदलाच्या P8I विमानाने अत्यंत खराब हवामान असतानाही व्यापक शोध मोहीम राबवली आणि बुडालेल्या जहाजातील अनेक वस्तू शोधल्या आहेत. नौदलाच्या म्हणण्यानुसार, तात्काळ प्रतिसाद म्हणून, चिनी पीएलए(एन) जहाजांच्या विनंतीवरून हिंदुस्थानी विमानांनी घटनास्थळी SAR उपकरणे तैनात केली होती. बीजिंगच्या सरकारी मीडियानुसार, आतापर्यंत दोन मृतदेह सापडले आहेत.