दर्जेदार लघुपट पाहण्याची संधी, चित्रभारती शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील चित्रपटप्रेमी आणि नवोदित कथाकारांसाठी एक खास पर्वणी ठरणारा ‘चित्रभारती शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल 2026’ आयोजित करण्यात आला आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर आणि प्रभात चित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच रोटरी क्लब ऑफ ठाणे एसेसच्या सहकार्याने हा लघुपट महोत्सव रंगणार आहे.

महोत्सवात निवडक आणि दर्जेदार लघुपटांचे प्रदर्शन करण्यात येणार असून, स्वतंत्र चित्रपटसृष्टीतील प्रभावी कथा, नावीन्यपूर्ण दृश्य मांडणी आणि सर्जनशीलतेचा अनोखा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे. हा महोत्सव गुरुवार, 4 जून 2026 रोजी सायंकाळी 6.30 वाजल्यापासून नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या तळमजल्यावरील ऋणानुबंध हॉलमध्ये होईल. सर्व चित्रपटप्रेमींना प्रवेश खुला आहे.

मुंबईचा गौरव सोहळा- सर्जनशील चित्रपटनगरी

युनेस्कोच्या ‘सर्जनशील चित्रपटनगरी’ या मानांकनाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ‘मुंबईचा गौरव सोहळा – युनेस्कोची सर्जनशील चित्रपटनगरी’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय अर्थात

नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट मुंबई येथे 22 ते 31 मे 2026 या कालावधीत हा सोहळा पार पडत आहे. या उपक्रमात नामवंत चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांसोबत संवाद सत्रांचे आयोजन करण्यात आले असून, प्रसिद्ध चित्रपट आणि ऑनिमेशन क्लासिक्सचे विशेष प्रदर्शनही प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. याशिवाय विविध विशेष सत्रे, कलात्मक सादरीकरणे आणि चित्रपटसृष्टीशी संबंधित उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. या उपक्रमाला सर्वांसाठी प्रवेश खुला आहे.