उर्फी भाजपमध्ये आली तर…! पत्रकारांनी प्रश्न विचारताच चित्रा वाघ यांचा तिळपापड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तोकडय़ा कपडय़ांच्या संस्कृतीच्या विरोधात लढा उभारणाऱया भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संभाजीनगरात झालेल्या पत्रकार परिषदेत उर्फी जावेदभोवतीच पिंगा घातला. उर्फी भाजपमध्ये आली तर… असा प्रश्न विचारताच चित्रा वाघ यांचा तिळपापड झाला. भाजपमध्ये अशा नंगट लोकांना स्थान नाही, आमच्या पक्षावर बोलू नका, असे त्या म्हणाल्या.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रविवारी संभाजीनगरात पत्रकारांशी संवाद साधला. चित्रा वाघ यांनी आपल्याला धमकी दिल्याची तक्रार उर्फी जावेदने केली आहे. यासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी आपण उर्फी जावेदला कोणतीही धमकी दिली नाही असे सांगितले. मी फक्त उर्फीला इशारा दिला आहे. रस्त्यावर उघडेवाघडे फिरू नको, असे सांगणे म्हणजे धमकी नाही असेही त्या म्हणाल्या. आमचा आक्षेप फक्त उर्फीच्या कपडय़ांवर आहे. इतर गोष्टींवर नाही, असा खुलासाही त्यांनी केला.

उर्फी भाजपमध्ये आली तर? असा प्रश्न एका पत्रकाराने विचारताच चित्रा वाघ जाम भडकल्या. असल्या नंगट लोकांसाठी भाजपमध्ये जागा नाही. भाजपमध्ये ध्येयासाठी काम केले जाते. संस्कृतीचा विषय चेष्टेवर नेऊ नका. माझ्यावर बोलतात ते ठीक आहे. पण आमच्या पक्षावर बोलू नका, माझ्या परिवारावर टीका करू नका, असे म्हणत त्यांनी पत्रकार आणि विरोधकांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. मी ऊठसूठ उर्फीवर बोलत नाही. मला प्रश्न विचारले जातात त्याची उत्तरे मी देते, असा खुलासाही त्यांनी केला.

उर्फीची चित्रा वाघ यांच्या विरोधात तक्रार
उर्फी जावेद हिने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात राज्य महिला आयोगाकडे रीतसर तक्रार केली आहे. मी फॅशन इंडस्ट्रीत काम करते. त्यामुळे माझे दिसणे, माझा पेहराव ही माझ्या व्यवसायाची गरज आहे. मात्र त्यावरूनच चित्रा वाघ यांनी मला मारण्याची धमकी दिली आहे. चित्रा वाघ यांच्या चिथावणीवरून माझ्यावर हल्ला होऊ शकतो, त्यामुळे आपल्याला सुरक्षित वाटत नसल्याचे उर्फीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. चित्रा वाघ यांच्या भडकावू विधानामुळे आपल्या जिवाला धोका असून, आपल्याला संरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही तिने केली आहे.