
राजेंद्र वाडेकर । राहुरी
चिकनचे कमी जास्त दरात विक्री होण्याच्या शुल्लक कारणांवरून भाईभाई व दिलखुश या दोघा चिकन विक्रेत्या दुकानदारांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याने ७ ते ८ गंभीर जखमी झाले. या हाणामारीत दोन्ही गटातील हल्लेखोरांनी कोयते, लाकडी दांडे व एकमेकांवर तुफान दगडफेक केल्याने नगर मनमाड राज्य मार्गावरील वाहतुक तब्बल तासभर ठप्प झाली होती.
नगर मनमाड राज्य मार्गावरील राहुरी बस स्थानका समोर राञी सात वाजण्याच्या सुमारास दोन गटात तुंबळ हाणामारीची ही घटना घडली. दोन्ही गटातील मारहाण करणा-यांची संख्या ५०० च्या पुढे होती. मारहाणीत कोयते, लाकडी दांडे व दगडांचा वापर करण्यात आल्याने नगर मनमाड राज्य मार्गावरील वातावरण तणावपूर्ण बनले होते. हाणामारी करणारे दोन्ही टोळके नगर मनमाड राज्य मार्गावर एकमेकांना लाकडी दांडे व दगडफेकीने हाणमार करत असल्याने परिसरातील दुकाने पटापट बंद झाली. पोलिसांचे पथक घटना स्थळी दाखल होताच दोन्ही गटातील हल्लेखोर पसार झाले. जखमींना उपचारासाठी नगर येथील खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले आहे.



























































