
ठाणे पालिकेतील लिपिक, टंकलेखक पदोन्नती प्रक्रियेत मोठा झोल झाला असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी आज केला आहे. सरकारच्या अधिसूचनेनुसार प्रारूप सेवा नियमांमध्ये पदोन्नतीसाठी ३ वर्षे सेवेची अट असताना महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या सेवा-ज्येष्ठता यादीत ५ वर्षे अट लागू करण्यात आली आहे. हा नियम अन्याय करणार असल्याचा आरोप कर्मचारी कैलास जाधव यांनी केला आहे.
ठाणे महापालिकेतील लिपिक-टंकलेखक पदोन्नती प्रक्रियेत नियमभंग करण्यात आला आहे. राज्यातील इतर पालिकांमध्ये ३ वर्षे सेवा अट लागू असताना ठाणे महापालिकेत वेगळी अट लावणे हे अन्यायकारक असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. मुळात शासन अधिसूचना ६ जून २०१७ तसेच प्रारूप सेवा नियमांमध्ये पदोन्नतीसाठी ३ वर्षे सेवा ही अट असताना महापालिकेने सेवा-ज्येष्ठता यादीत ५ वर्षे सेवा अट लागू का केली, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
चुकीच्या अटीमुळे अनेक पात्र व वरिष्ठ कर्मचाऱ्यांची पदोन्नती लांबणीवर पडली आहे. मर्जीतील कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेचा फायदा मिळावा म्हणून शासन निर्णयच फिरवला असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.
कर्मचाऱ्यांनी याबाबत १०० हून अधिक लेखी अर्ज, हरकती, शासन निर्णय व संबंधित कागदपत्रे प्रशासनास सादर केली असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले. घाईघाईने पदोन्नती प्रक्रिया राबवण्यात येत असल्याचेही निदर्शनास आणले आहे.
काही व्यक्तींना लाभ मिळावा यासाठी जाणीवपूर्वक अटी बदलण्यात आल्या असून यामागे आर्थिक हितसंबंध असल्याचाही संशय व्यक्त होत आहे.
योग्य निर्णय न घेतल्यास आमरण उपोषण
ठाणे पालिकेच्या या कारभाराविषयी नुकत्याच झालेल्या अधिवेशनात आवाज उठवूनही सकारात्मक निर्णय पालिका प्रशासन घेत नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच योग्य निर्णय न घेतल्यास न्यायालयात दाद मागण्यात येईल आणि तीव्र आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दिला आहे.


























































