निंबळकच्या महिला सरपंचासह लिपिकाला लाचप्रकरणात अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कामाचे बिल काढण्यासाठी ठेकेदाराकडून 20 हजारांची लाच घेणाऱया नगर तालुक्यातील निंबळक ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचासह लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. सरपंच प्रियांका अजय लामखडे (वय 35), लिपिक दत्ता वसंत धावडे (वय 40, दोघे रा. निंबळक, ता. नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

तक्रारदार हे कंत्राटदार असून, त्यांना निंबळक-लिंगतीर्थ रस्त्याच्या मजबुतीकरणाच्या कामाचा ठेका जिल्हा परिषदेकडून मिळाला होता. त्यांनी या रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करून केलेल्या कामाचे 13 लाख 65 हजार 56 रुपयांचे बिल मंजुरीसाठी जिल्हा परिषदेत सादर केले होते. हे बिल मंजूर होऊन निंबळक ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले होते. तक्रारदाराला 12 लाख 38 हजार 556 रुपयांचा सरपंच व ग्रामसेवकांच्या स्वाक्षरीचा धनादेश मिळाला होता. त्यावेळीही लामखडे यांनी तक्रारदाराकडून पैसे घेतल्यानंतरच धनादेशावर सही केली होती. दरम्यान, तक्रारदाराच्या बिलातील  एक लाख 26 हजार रुपये ग्रामपंचायतीने ‘जीएसटी’पोटी राखून ठेवले होते. तक्रारदाराने जीएसटीची पूर्तता करून एक लाख 26 हजार रुपयांच्या धनादेशाची मागणी ग्रामसेविकेकडे केली असता, त्यांनी सही करून धनादेश तयार ठेवला होता; परंतु या धनादेशावर सही करण्यासाठी सरपंच प्रियांका लामखडे यांनी 20 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर आज निंबळक येथे पडताळणी केली असता, आरोपी सरपंच  व  लिपिकाने तक्रारदाराकडे 20 हजारांची मागणी करून ते पैसे सरपंच लामखडे  यांनी आरोपी लिपिकाकडे देण्यास सांगितले. ‘पैसे मिळाल्यानंतरच बिलाच्या धनादेशावर सही करेन,’ असे लामखडे यांनी सांगितल्याचे त्यात निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने निंबळक ग्रामपंचायतीसमोर सापळा रचून 20 हजार रुपये स्वीकारताना लिपिकाला रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

पोलीस निरीक्षक शरद गोरडे, हवालदार संतोष शिंदे, विजय गंगुल, अंमलदार वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, पोलीस नाईक संध्या म्हस्के, राधा खेमनर, हारून शेख, तागड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.