
दावोसमध्ये मुख्यमंत्री फक्त 3 ते 4 तासच झोपले असे म्हणतात. मग करत काय होते? त्यावेळी इतर लोकं तर झोपले होते.
महाराष्ट्राची फसवणूक कधीपर्यंत होत राहणार? हिंमत असेल तर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी दावोसमधील गुंतवणुकीबाबत आमनेसामने चर्चेसाठी यावे.
घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज कडाडून टीका केली. 28 तासांच्या या दौऱ्यावर 40 कोटी रुपये खर्च झाला. पण महाराष्ट्राला काय मिळाले, असा सवाल त्यांनी केला. दावोसमध्ये झालेल्या करारांमधून आणलेल्या गुंतवणुकीच्या आकडय़ाचीही पोलखोल करतानाच, नक्की किती गुंतवणूक आली आणि त्यातून किती नोकऱ्या मिळणार याचीही माहिती त्यांनी दिली.
आदित्य ठाकरे यांनी आज दादर येथील शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दावोस दौरा आणि रस्ते काँक्रिटीकरण घोटाळ्याचा तारीखवार आणि आकडेवारीसह समाचार घेतला. ‘दावोसमध्ये महाराष्ट्र सरकारचा 16 ते 20 नोव्हेंबर असा चार दिवसांचा कार्यक्रम असेल. पण मुख्यमंत्री 16 तारखेला सायंकाळी साडेसात वाजता पोहोचले आणि 17 तारखेला काही बैठका करून रात्री मुंबईत परतले. या दौऱ्यावरचा प्रत्येक दिवसाचा खर्च मोजला तर साडेसात ते दहा कोटी रुपये आहे. तो अजूनही वाढू शकतो. कारण मुख्यमंत्री त्यांच्यासोबत मित्रपरिवारही घेऊन गेले होते. त्यांनी तिथे गाडय़ाही वापरल्या, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
चार्टर विमानाने गेले तरीही महाराष्ट्राचे नुकसान झाले
एखाद्या महत्वाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्यासाठी चार्टर विमानाचा वापर केला जातो. पण घटनाबाह्य मुख्यमंत्री दावोसमध्ये कमर्शियल विमानाऐवजी चार्टर विमानाने गेले. त्यासाठी दोन ते अडीच कोटींचा खर्च झाला. तरीसुध्दा ते उशिरा पोहोचले आणि मुख्यमंत्री नसल्याने महाराष्ट्रासाठी महत्वाच्या असलेल्या अनेक बैठका रद्द केल्या गेल्या, असे आदित्य ठाकरे म्हणाले. महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना आम्हीही दावोसला गेलो होतो आणि तिथे महाराष्ट्राच्या पॅव्हेलियनचे उद्घाटन आम्ही सकाळी साडेआठ वाजता केले होते याचीही आठवण आदित्य ठाकरे यांनी यावेळी करून दिली.
देशातील महत्त्वाच्या राज्याचे मुख्यमंत्रीच लेट पोहचतात आणि दुसऱ्या दिवशी दोन-तीन जणांना ते कोणाचे माणूस आहेत ते सांगतात आणि संध्याकाळी तातडीने परत येतात. हेच करायचे होते तर ज्या 33 देशांनी तुमच्या गद्दारीची दखल घेतली त्यांना ईमेल करू शकला असतात. त्यावर 40 कोटी खर्चण्याची काय गरज होती, असा टोलाही त्यांनी लगावला.
खरे रोजगार किती मिळणार?
मिंधे सरकारने दावोसमधून आणलेल्या गुंतवणुकीतून 1 लाख 1 हजार 389 इतके रोजगार उपलब्ध होतील असा दावा केला; पण त्या गुंतवणुकीमधून वरील चार कंपन्या वजा केल्या तर रोजगारांचा आकडा फक्त 76389 इतका उरेल. म्हणजेच वेदांता फॉक्सकॉनपेक्षाही कमी गुंतवणूक आणि नोकऱ्या मिंधे सरकारने आणल्या. यातील न्यू एरा क्लिनटेक सोल्यूशन या कंपनीने तर आपले नाव बदलले आहे. तिचे नाव 21 जानेवारी 2019 रोजी न्यू अर्थटेक एरा असे होते, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
खरी गुंतवणूक किती आणली?
दावोसमधून 1 लाख 37 हजार 664 कोटींची गुंतवणूक आणली असा मिंधे सरकारचा दावा यावेळी आदित्य ठाकरे यांनी खोडून काढला. मिंधे सरकारने ज्या कंपन्यांशी करार केल्याचे सांगितले त्यातील चंद्रपूरची न्यू एरा क्लिनटेक सोल्यूशन, पुण्यातील निप्रो फार्मा आणि महिंद्रा ऑटोमोबाईल्स आणि गडचिरोलीतील वरद फेरो ऍलॉईज या कंपन्यांबरोबर पूर्वीच करार झाले होते. या करारांचा 33170 कोटी रुपयांचा आकडा मिंधे सरकारला वगळावाच लागेल. तसे केल्यास खरी गुंतवणूक ही केवळ 1 लाख 4 कोटी 496 कोटी रुपये इतकीच होते, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
मित्रपरिवार सोबत गेला होता का?
मुख्यमंत्र्यांसोबत दावोसमध्ये गेलेल्या प्रतिनिधी मंडळात कोण होते? एमआयडीसीकडून कोण होते? अधिकृत आणि अनधिकृत कोण होतं? मित्रपरिवार सोबत गेला होता का? गाडय़ा कुठल्या वापरल्या? ते कुठे राहिले? त्यांचा खर्च कोणी केला? या प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्रातील जनतेला मिळालीच पाहिजेत असे आदित्य ठाकरे यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
आमचे सरकार आल्यानंतर रस्ते घोटाळय़ाची चौकशी करणार
मुंबईतील 400 किलोमीटरच्या रस्ते काँक्रिटीकरणाच्या टेंडरमध्ये घोटाळा झालाय हे उघडउघड दिसतेय असे सांगतानाच, राज्यात आणि मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची पुन्हा सत्ता आल्यानंतर या टेंडर घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करू, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला. 48 टक्केपेक्षा जास्त किमतीत कंत्राटदारांना कामे देण्यात आली आहेत. पाच कंत्राटदारांना पाच कामे कशी मिळाली, असा सवालही त्यांनी केला. बीकेसीमध्ये मोठा कार्यक्रम झाला त्याच रात्री साडेदहा वाजता महानगरपालिकेने एक पत्रक काढले. ते वाचले तर कंत्राटदारांना टेंडर प्रक्रिया न राबविताना कंत्राट दिले गेले असे दिसते. म्हणजेच कुठेतरी घोटाळा झाला आहे. महापालिकेने ठरवले आणि कामे दिली, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.


























































