घरात कोरोना रुग्ण असताना कुलूप लावून बसू नका! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जनतेला आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरकारी टीम आता जेव्हा कोरोना चौकशी करायला घरात जाते तेव्हा जर कोरोना रुग्ण घरात असेल तर शेजाऱयांना सांगून लोक बाहेरून कुलूप लावत आहेत. असे प्रकार करू नका.  आपण हा धोका स्वतःला करीत आहातच, पण आपल्या कुटुंबालाही धोक्यात घालू नका असा इशारा देतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  कोरोना चाचणी करायला घाबरू नका, सरकारी विलगीकरण कक्षात जायला लागले तर काळजी करू नका, असे आवाहन आज राज्यातील जनतेला केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हद्वारे गुरूवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, जेव्हा आपण ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम राबवली. तेव्हा घराघरामध्ये येऊन आपली यंत्रणा कुटुंबात येऊन चौकशी करीत होते. तेव्हा लोक आपल्या कुटुंबात किती लोक आहेत, सहव्याधी कोणाला आहेत याची माहिती देत होते. पण आता जर का कुटुंबात कोरोना पॉझिटिव्ह सापडला आणि त्यांच्याकडे चौकशी करायला गेले तर सांगतात की, आम्ही एवढेच जण इथे राहतो. आणखी कोणी इथे राहत नाही. असे करू नका. आपण स्वतःला व कुटुंबाला धोक्यात घालत आहात.

जेवढ्या लवकर चाचणी, तेवढ्या लवकर इलाज

80 टक्के असे रुग्णांना कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. हे रुग्ण समाजात मिसळत आहेत. यामुळे बऱयाच ठिकाणी कुटुंबेच्या कुटुंबे बाधित होत आहेत. यातील एखादा जरी गंभीर झाला तर जबाबदारी कोणाची? तेव्हा कोरोना टेस्ट करून घ्यायला घाबरू नका. जेवढ्या लवकर चाचणी केली जाईल, जेवढ्या लवकर इलाज होईल तेवढ्या लवकर आपणही सुरक्षित राहाल आणि आपलं कुटुंबही सुरक्षित राहील, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आपल्याला लॉकडाऊन होऊ द्यायचा नाही!

जो जगाचा अनुभव आहे त्याच अनुभवातून आपण जात आहोत. पाश्चिमात्य देशांत त्यांनी कडक लॉकडाऊन केला होता. आपल्याला लॉकडाऊनच होऊ द्यायचा नाही. आरोग्य सुविधा आपल्याकडे आहेत, पण इतर देशांच्या अनुभवाकडे लक्ष टाकलं तर तिथे दुसरी लाट आली तेव्हा तिथली रुग्णसेवा कोलमडून पडली.  म्हणून मी जी त्रिसूत्री सांगतोय ती पाळा, गर्दी टाळा, नाहीतर नाइलाजाने पुन्हा पहिल्यापासून एबीसीडी करावी लागेल, असा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिला.

एक-दोन दिवसांत हॉटेल्स-कार्यालयांसाठी निर्बंध जाहीर करणार

रुग्णसंख्या जेव्हा कमी झाली होती तेव्हा काही लोक सांगू लागले की आपण जी कोविड केअर सेंटर केली आहेत ती पडून आहेत त्याची गरज नाही, त्याचा खर्च वाढतोय. तेव्हा मी सांगितलं की अजिबात ती बंद करू नका. कारण गेल्या वर्षी मार्चमध्ये पहिला रुग्ण सापडला होता. एप्रिलअखेरपर्यंत सतर्क राहावं लागेल. दुर्दैवाने फेब्रुवारीमध्येच पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. अजूनही सप्टेंबरमध्ये जी रुग्णसंख्या होती त्या रुग्णसंख्येपर्यंत जाऊ नये ही नुसती प्रार्थना नाही तर प्रयत्न असायला हवेत. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न करायचे असतील तर पुन्हा थोडी बंधनं स्वतःहून पाळावी लागतील. लस घेतल्यानंतरसुद्धा मास्क घालणे, हात धुत राहणे, अंतर राखणे हे हिताचं आहे. कार्यालयांत, हॉटेल्समध्ये जिथे जिथे बंदिस्त जागेत गर्दी होते तिथे निर्बंध जाहीर करावे लागतील. याबद्दलची सूचनावली एक-दोन दिवसांत जाहीर करीत आहोत.