हे पाप काँग्रेसी नेत्यांचे, गुन्हेगार सपाशी संबंधित; सोनभद्र प्रकरणाबाबत योगी आदित्यनाथ बरसले

38

सामना प्रतिनिधी । सोनभद्र

उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे नुकत्याच झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उभ्भा गावातील मृतांच्या नातलगांना भेटून त्यांचे सांत्वन केले. यानंतर ते म्हणाले की, हे पाप काँग्रेसच्या नेत्यांचे आहे आणि ज्यांनी हा गुन्हा केला आहे त्यांचा समाजवादी पार्टीशी संबंध आहे. मृतांच्या नातलगांना प्रत्येकी 18 लाख रुपये मिळणार असून जखमींच्या नातलगांना प्रत्येकी अडीच लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. याशिवाय उपजीविकेसाठीही सरकार व्यवस्था करणार आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मृतांच्या नातलगांना म्हणाले की, या घटनेबाबत ऐकले तेव्हा प्रचंड दुःख झाले. आता मी येथे येतच राहीन. तुम्ही काहीच काळजी करू नका. आमचे अधिकारी येथे सतत नजर ठेवून राहतील. काहीही घडले तरी लगेच आम्हाला सांगा. तुम्हाला पूर्ण मदत दिली जाईल. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातलगांपैकी प्रत्येकाची विचारपूस केली. त्यांच्या मुलांना उचलून घेतले. उत्तर प्रदेश सरकारने गावप्रमुखाला आणि त्याच्या माणसांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मोठा शस्त्र्ासाठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सरकारने दोन समित्या स्थापन केल्या आहेत. पोलिसांकडून बेपर्वाई होत असेल तर त्याचीही मुख्यमंत्र्यांकडून चौकशी केली जात आहे.

आरोपींवर रासुका लावणार!

उभ्भा गावाहून परतल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. ते म्हणाले की, मुख्य आरोपी गावप्रमुख यज्ञ दत्त हा सपाचा कार्यकर्ता आहे. त्याला कठोर शिक्षा केली जाईल. त्याचा भाऊ बसपाचा कार्यकर्ता आहे. सर्व गुन्हेगारांवर ‘रासुका’अंतर्गत कारवाई होणार आहे. सोनभद्र परिसरातील सर्वच जमिनींची चौकशी केली जाणार असून त्यात दोषी आढळणाऱयाविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असेही योगी म्हणाले. 17 जुलै रोजी सोनभद्रमधील उभ्भा गावात काही थोड्या जमिनीसाठी दहा ग्रामस्थांना गोळ्या घालून ठार करण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या