
मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणाऱया कोस्टल रोडवरच्या बोगद्यांमध्येही प्रवाशांना मोकळ्या हवेत प्रवास करता येणार आहे. खेळत्या हवेसाठी 2.07 किमीच्या बोगद्यांमध्येही ‘सकार्डो नोझल यंत्रणा’ बसवण्यात येणार आहे. रोडवरील बोगद्यांमध्ये अशा प्रकारे पहिल्यांदाच सकार्डो नोझल यंत्रणा बसवण्यात येत आहे. दरम्यान, कोस्टल रोडचे काम सध्या वेगात सुरू असून 25 टक्के काम पूर्णही झाले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि पालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणारा आणि वाहतूक कोंडीमुक्त करणाऱया कोस्टल रोडचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.
13 हजार कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंकपर्यंतच्या 10.58 किमीच्या या कामात 2.07 किमीचे दोन महाबोगदे अत्याधुनिक ‘मावळा’ टनेल बोअरिंग मशीनने खोदण्यात येत आहेत. जमिनीखाली 10 ते 70 मीटर खाली हे बोगदे खोदले जात आहेत. जमिनीखाली इतक्या खाली बोगदे खोदले जात असल्यामुळे हवा खेळती राहण्यासाठी सकार्डो नोझल यंत्रणा बसवण्यात येत आहे.
या यंत्रणेमुळे एखादी दुर्दैवी घटना घडल्यास उत्पन्न होणारा धूर या यंत्रणेमधून वेगाने बाहेर फेकला जाणार आहे. त्यामुळे आपत्कालीनप्रसंगी बचावकार्य करणे सोपे जाणार आहे. सकार्डो यंत्रणा अग्निशमन यंत्रणा व आपत्कालीन यंत्रणेशी जोडली जाणार असल्याची माहिती प्रकल्पाच्या प्रमुख अभियंता सुप्रभा मराठे यांनी दिली. या यंत्रणेद्वारे बोगद्याच्या एका बाजूने हवा अत्यंत तीव्रतेने आतमध्ये ढकलली जाईल व बोगद्याच्या दुसऱया बाजूने ती बाहेर ढकलली जाईल. बोगद्याची वाहतूक ज्या दिशेने जात असेल, त्याच दिशेने ही हवा खेळती राहील, याची काळजी या यंत्रणेद्वारे घेतली जाणार आहे.
अशी आहे अद्ययावत यंत्रणा
या यंत्रणेमध्ये प्रत्येकी 2 मीटर व्यासाच्या वैशिष्टय़पूर्ण पंख्यांचा समावेश असून प्रत्येक बोगद्यासाठी 3 यानुसार दोन्ही बोगद्यांसाठी एकूण 6 पंखे असणार आहेत. बोगद्यांच्या आत आणि बोगद्यांच्या वर ‘सकार्डे नोझल’ यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यामुळे हवा खेळती राहण्यास मदत होणार आहे. तसेच वाहनातून बाहेर पडणारा धूर बोगद्याबाहेर ढकलण्यासही या यंत्रणेची मदत होणार असल्याचे प्रकल्पाच्या प्रमुख अभियंता सुप्रभा मराठे यांनी सांगितले.
दोन्ही बोगद्यांच्या मुखांजवळ पंख्यांशी जोडलेली वैशिष्टय़पूर्ण यंत्रणा बसविली जाईल. तर या यंत्रणेमध्ये पंखे असलेला भाग बोगद्यांच्यावर एक इमारत बांधून त्यामध्ये बसविला जाणार आहे. यामध्ये असणारे पंखे हे प्रतिमिनिट 1800 ‘राऊंड’ या उच्च वेगाने गोल फिरणारे असतील. प्रत्येक बोगद्यासाठी 3 याप्रमाणे दोन्ही बोगद्यांसाठी 6 पंखे असणार आहेत. सकार्डे नोझल या यंत्रणेचे आयुर्मान हे 50 वर्ष असून, आगीचा परिणाम होणार नाही, अशा पद्धतीने ही यंत्रणा असणार आहे.






























































