सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील यात्रा, उत्सव साध्या पद्धतीने जास्तीत जास्त 50 व्यक्तींच्या उपस्थितीत साजरे करण्यात येणार आहेत. इतर गावातून भाविक मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी करून त्या ठिकाणी त्यांना अडचणी येऊ नयेत. तसेच कोरोनाचा वाढता धोका असल्याने जिल्हादंडाधिकारी यांनी 15 मार्च ते 29 मार्चपर्यंत जिल्ह्याच्या संपूर्ण भागामध्ये मनाई आदेश जारी केले आहेत.
आगामी सण होळी, धुलीवंदन, शब-ए-बारातनिमित्ताने आयोजित होणारे कार्यक्रम, विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी यांच्याकडून पूर्व तयारी निमित्त होणोरे कार्यक्रम, तसेच जिल्ह्यात होणारी उपोषणे, मोर्चा, निदर्शने, रास्ता रोको यासारखी आंदोलने लक्षात घेता कोणताही अनुचीत प्रकार घडू नये. तसेच कोरोनाचा धोका वाढत असल्याने हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
या मनाई आदेशानुसार पुढील कृत्ये करण्यास मनाई असणार आहे. शस्त्र, सोटे तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किवा लाठ्या, किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बाळगणे, अंग भाजून टाकणारा पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थासह फिरणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, व्यक्तींची किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह घोषणाबाजी करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजवणे.
कलम 37 (3) नुसार, जिल्ह्यामध्ये 5 अगर पाचहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे, मिरवणूका काढणे व सभा घेणे यास मनाई आहे. हा आदेश सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांची कर्तव्यासाठी लागू नाही. तसेच परवानगी घेतलेल्या लग्न इत्यादी धार्मिक समारंभ यांना आणि प्रेतयात्रेसाठी लागू नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.

























































