
सामना ऑनलाईन । नगर
नगर महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 6 ड मधून अपक्ष उमेदवार असलेल्या किशोर मधुकर जोशी यांनी भाजपचे उमेदवार रवींद्र बारस्कर यांनी खोटी जाहिरात केल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रभागातील अपक्ष उमेदवार किशोर जोशी यांनी आपल्याला पाठिंबा जाहीर केला आहे, अशी जाहिरात बारस्कर यांनी एका वर्तमानपत्रात दिली होती. मात्र, आपण बारस्कर यांना पाठिंबा दिलेला नाही. तसेच देणार नाही असे जोशी यांनी जाहीर केले आहे. बारस्कर यांनी सत्तेचा गैरवापर करत वर्तमानपत्रात खोटी जाहिरात प्रसिद्ध केल्याप्रकरणी त्यांच्यावर निवडणूक नियमावलीनुसार कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.


























































