
मुंबई व परिसरातील शाळांमध्ये कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण 5 सप्टेंबरपूर्वी पूर्ण करा, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे. केंद्र सरकारने राज्यातील सर्व शिक्षकांचे प्राधान्याने लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार मुंबईतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या लसीकरणासाठी शाळांजवळच प्रत्येक विधानसभा क्षेत्रात व्यवस्था करावी, तसेच शक्यतो शिक्षकांच्या घराजवळ लसीकरण केंद्रे सुरू असतील तिथे प्राधान्यक्रम देऊन लसीकरण करावे, अशी मागणी शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे यांनी केली आहे.
मुंबईतील 70 टक्के शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी लगतच्या ठाणे, पालघर व रायगड जिह्यांतील मनपा क्षेत्रात तसेच जिह्यातील नगरपालिका व ग्रामीण भागात राहतात. सध्या ऑनलाइन शिक्षणही सुरू आहे. त्यामुळे शिक्षकांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र उभारण्याची मागणीही त्यांनी केली. तसेच कोरोनाकाळातील रजेबाबत महाराष्ट्र आरोग्य संचालनालयाने याअगोदरच महानगरपालिकांना पत्र दिले आहे. त्यानुसार कर्मचाऱयांना कोरोना रजा मिळावी, असेही परिषदेने म्हटले आहे.


























































