CWC 2023 क्रिकेटरसिकांना पॉपकॉर्न आणि कोल्डड्रींक मोफत देणार, एमसीएचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रिकेट विश्वचषक 2023 तील मुंबईतील वानखेडे मैदानावर होणाऱ्या सामन्यांसाठी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक खूशखबर आहे. मैदानात येऊन सामने पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने पॉपकॉर्न आणि कोल्डड्रींक मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा प्रेक्षकांना एकदाच दिली जाईल असे एमसीएने X (पूर्वीचे Twitter) पोस्टमध्ये म्हटले आहे.

वानखेडे मैदानावर हिंदुस्थान विरूद्ध श्रीलंकेचा सामना होणार असून हा सामना 2 नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. 7 नोव्हेंबरला याच मैदानावर ऑस्ट्रेलिया विरूद्ध अफगाणिस्तान सामना होणार आहे. विश्वचषक स्पर्धेचा उपांत्य फेरीतील पहिल्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघाचा सामनाही याच मैदानावर 15 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे.2 नोव्हेंबरला होणाऱ्या हिंदुस्थान विरूद्ध श्रीलंकेच्या सामन्यापासून मोफत पॉपकॉर्न आणि कोल्डड्रींक देण्यास सुरुवात केली जाणार आहे.

ढाई हजार का पाँच सौ… स्वस्तात तिकिटांचा मुंबईकरांनी घेतला लाभ

वर्ल्ड कपची तिकीट विक्री सुरू झाल्यानंतर ‘बुक माय शो’वर सर्वच महत्त्वाच्या लढती सोल्ड आऊट दाखवल्या जात होत्या. सामान्य क्रिकेटप्रेमींना काही केल्या तिकिटे मिळत नव्हती. पण 24 ऑक्टोबरला वानखेडे स्टेडियमबाहेर 2500 रुपयांची तिकिटे चक्क 500 रुपयांना गळी मारण्याचा प्रकार पाहायला मिळाला. दक्षिणा आफ्रिका विरूद्ध बांग्लादेश सामन्यात डिकॉक आणि क्लासनचा झंझावात संचारल्यामुळे अस्सल मुंबईकर क्रिकेटप्रेमींनी स्वस्तात मिळणाऱया तिकिटांचा लाभ घेत षटकारबाजी पाहण्यात धन्यता मानली.

वानखेडेवर मुंबईकरांची गर्दी पाहून निश्चितच बरे वाटले. पण जी तिकिटे ऑनलाईन मिळत नव्हती. ती तिकिटे चक्क ढाई हजार का पाँच सौ या दरात कोण विकत होता? का विकत होता? हेच कळत नव्हतं. इतक्या मोठय़ा प्रमाणात या सामन्याची तिकिटे ब्लॅकर्सने काढण्याचा प्रश्नच नव्हता. तरीही हा सामना सोल्ड आऊट होता असे म्हटले जात होते. अन्य सामन्यांच्या तुलनेत वानखेडेवरच्या गर्दीला तुफान गर्दी निश्चित म्हणू शकतो. पण या सामन्याची तिकिटे स्टेडियमच्या बाहेर स्वस्तात सर्रास विकली जात होती आणि चाहतेही आनंदाने तिकिटे विकत घेऊन सामना पाहायला जात होते.

सामन्यांची  किती तिकिटे ऑनलाईन विकली गेली? याबाबत मुंबई क्रिकेट संघटना कोणतीही माहिती देऊ शकली नव्हती. असे असताना ही तिकिटे कोण विकतोय, याबद्दल ते काय उत्तर देणार. संघटनेकडून याचे उत्तरही मिळण्याची शक्यता नाही, पण ही तिकिटे अशी स्वस्तात विकण्यापेक्षा तिकिटांचे दर कमी करून ऑनलाईन ती विकण्याचे आदेश बीसीसीआयने सर्व राज्य संघटनांना द्यावेत, अशी विनंती क्रिकेटप्रेमींकडून केली जात आहे.