
सामना ऑनलाईन, मुंबई
दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्रासाठी 7 हजार 962 कोटी रुपयांची मागणी केंद्र सरकारकडे केली होती, पण प्रत्यक्षात 4 हजार 714 कोटी रुपयांची मदत केंद्र सरकारने राज्याला केली. दुष्काळग्रस्तांसाठी संपूर्ण मदत राज्याला मिळू शकली नाही हे भाजप सरकारचे अपयश असून केंद्रात महाराष्ट्राची पत नाही व महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना मदत करण्याची केंद्राची मानसिकता नाही अशा शब्दांत काँग्रेसने भाजप सरकारवर हल्ला चढवला आहे. राज्यातील दुष्काळग्रस्तांना केंद्र सरकारने अतिशय अपुरी आर्थिक मदत केल्याच्या मुद्दय़ावरून काँग्रेसने भाजप सरकारवर घणाघाती टीका केली आहे. महाराष्ट्राने मागितलेली मदत राज्यातील भाजप सरकार पदरात पाडून घेऊ शकले नाही हे राज्यातील भाजप सरकारचे अपयश आहे. दुष्काळ हाताळण्यात राज्यातील भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.






























































