आंदोलनादरम्यान काँग्रेस नेते चिदंबरम जखमी, पोलिसांसोबतच्या संघर्षादरम्यान खासदार प्रमोद तिवारींना फ्रॅक्चर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राहुल गांधी सोमवारी अंमलबजावणी संचालनालयात (ईडी) हजर झाले होते. यावेळी काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी केंद्र सरकार विरोधात निदर्शने केली. त्यांनी तपास यंत्रणांचा गैरवापर करून देशात दहशत पसरवली असा आरोप केला. काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार रणदीप सिंग सुरजेवाला यांनी ट्विट करून दावा केला की, माजी गृहमंत्री चिदंबरम यांना पोलिसांनी मारहाण केल्यामुळे ते जखमी झाले आहेत.

सुरजेवाला यांनी लिहिले की, मोदी सरकारने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांना पोलिसांनी मारहाण केली, त्यांचा चष्मा जमिनीवर फेकला गेला त्यामुळे त्यांच्या डाव्या बरगडीला हेअरलाइन फ्रॅक्चर झाले आहे. तसेच खासदार प्रमोद तिवारी यांना देखील रस्त्यावर फेकण्यात आले. यामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आणि बरगडी देखील फ्रॅक्चर झाली. ही लोकशाही आहे का?”

दुसर्‍या ट्विटमध्ये ते म्हणाले की, संपूर्ण दिवस उलटून गेला तरी हल्ला सुरूच आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. खासदार शक्ती सिंह गोहिल यांच्यावर हल्ला करण्यात आला. काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. लोकशाही पायदळी तुडवली गेली. त्यामुळे आता देश मोदी सरकारला माफ करणार नाही.