
उद्योगपती गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटचे संबंध आहेत. अदानी यांनी 20 वर्षात भाजपला अनेकदा पैसे दिले, असा आरोप काँग्रेसने केला आहे. अदानी मुद्द्याचे संसदेतही पडसाद उमटले. पंतप्रधान मोदी गुरुवारी संसदेत भाषणाला उभे राहताच विरोधकांनी अदानी मुद्द्यावरून जोरदार घोषणाबाजी केली. तरीही मोदी यांनी आपले भाषण सुरुच ठेवले. मात्र एका तासापेक्षाही जास्त भाषण करून त्यांनी काँग्रेसने केलेल्या आरोपांवर कोणतेही भाष्य केले नाही. यावरूनच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदी यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत असतील तर ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. मात्र मागच्या दौऱ्यादरम्यान मी त्यांना महाराष्ट्रातील प्रश्नांची जाणीव करून दिली होती. आता राज्यातील प्रश्नांत वाढ झाली आहे. आमचे नेते राहुल गांधी यांना लोकसभेत काही प्रश्न विचारले आहेत. अदानी समूहासोबतचे तुमचे संबंध, तुम्ही त्यांना किती कंत्राट दिले? ते तुमच्यासोबत किती दौऱ्यात होते. अगोदरही ते किती वेळा तुमच्या सोबत होते? असे प्रश्न त्यांना विचारण्यात आले. मात्र या प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली नाहीत, असे पटोले म्हणाले.
पंतप्रधान मोदी लोकसभेत बोलत नाहीत. मात्र बाहेर ते मन की बात करतात. ते जनतेच्या मनातील ओळखतात असे म्हटले जाते. 140 कोटी लोक माझ्यासोबत आहेत, असे ते सांगतात. मग या देशातील ज्या माणासे एलआयसी, बँकेत पैसे भरलेले आहेत, ते सगळेच भयभयीत आणि संभ्रमात आहेत. राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मोदी लोकसभेत देऊ शकलेले नाहीत. गल्लीबोळातील उद्घाटन करण्यापेक्षा देशातील लोकांच्या मनात निर्माण झालेला संभ्रम त्यांनी मुंबईततरी दूर करावा,” अशी मागणी पटोले यांनी केली.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, महागाई अशा प्रश्नांवर ते बोलायला तयार नाहीत. ते मुंबईत येत असतील तर त्यांचे स्वागत आहे. मात्र राहुल गांधी यांनी जे प्रश्न उपस्थित केले, त्याची उत्तरं त्यांनी दिली पाहिजेत. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई कशी कमी करणार? या प्रश्नांची उत्तर त्यांनी द्यावीत, असेही पटोले म्हणाले.

























































