
सामना ऑनलाईन । लखनौ
होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी सगळ्या राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेसनेही प्रत्येक राज्यात या निवडणुकीसाठी तयारी सुरूवात केली आहे. प्रसारमाध्यमांपुढे भाजपला चीतपट करण्यासाठी, पक्षाची बाजू लावून धरण्यासाठी, आरोपांना उत्तर देण्यासाठी काँग्रेस नव्या दमाचे प्रवक्ते शोधतेय. यासाठी काँग्रसने एक परीक्षा घ्यायचं ठरवलं. कार्यकर्त्यांनी मात्र पेपर फोडत, कॉपी करत पक्षाच्या नेत्यांवर नामुष्कीची वेळ आणलीय.
२० जून रोजी उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राज बब्बर यांनी काँग्रेसच्या मीडिया सेलसहित अनेक विभाग बरखास्त केले होते. त्यामुळे या विभागांसाठी नव्याने परीक्षा घेऊनच कार्यकर्ते निवडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. काँग्रेसच्या संचार विभागाच्या संयोजिका प्रियांका चतुर्वेदी आणि माध्यम संयोजक रोहन गुप्ता हे दोघेही दिल्लीहून प्रश्नपत्रिका घेऊन आले होते. काँग्रेसच्या नेत्यांना याची कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. गुरुवारी त्यांना पक्षाची बैठक असल्याचं सांगण्यात आलं होतं. बैठकीला आलेल्या काँग्रेसच्या नेत्यांची नोंदणी करण्यात आली होती आणि तिथेच प्रवक्तेपदासाठी इच्छुक असल्यास परीक्षा देण्यासाठी सांगण्यात आलं.
या परीक्षेत उत्तर प्रदेशमधला काँग्रेसचा राजकीय इतिहास, निवडणुकीतले विजय, मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या सरकारचे अपयश, त्या दिवशीच्या प्रमुख बातम्या इत्यादी विषयांवर १४ प्रश्न विचारण्यात आले होते. या परीक्षेत तब्बल ६५ परीक्षार्थी सहभागी झाले होते. प्रश्नपत्रिका समोर आल्यानंतर मात्र यातल्या बहुतांश परीक्षार्थींना घाम फुटला, यातील काहींनी गुगलच्या मदतीने उत्तरं देण्याचा प्रयत्न केला तर बहुतांश लोकांनी एकमेकांना विचारत उत्तर लिहली. या सगळ्यांना कॉपी करताना पकडण्यात आलं हे विशेष!
काँग्रेसचे नेते अशोक सिंह यांनी मात्र या आरोपांचं खंडन केलं असून त्यांच्या म्हणण्यानुसार मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्येही यापूर्वी अशा प्रकारच्या परीक्षा झाल्या आहेत. ही नियमित प्रक्रिया असून यात कुठेही कॉपी झालेली नाही, असं सिंह यांचं म्हणणं आहे.






















































