
सामना ऑनलाईन, इंदूर
येत्या 28 नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशात विधानसभेची निवडणूक होत आहे. यासाठी काँग्रेसने आपला वचननामा जाहीर केला आहे. मध्य प्रदेशात सत्ता आल्यास सरकारी इमारती, कार्यालये आणि परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा स्थापन करण्यास बंदी घालण्यात येणार असल्याचे वचन देण्यात आले आहे. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना संघाच्या शाखांमध्ये भाग घेण्याची परवानगी देणारा अध्यादेश रद्द करण्यात येईल, असे आश्वासनही या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.
काँग्रेसने या वचननाम्यात प्रभू राम, नर्मदा, गोवंश आणि गोमूत्राचा उल्लेख करून सॉफ्ट हिंदुत्वाचा पुरस्कार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. चित्रकूटमधून सुरू होणाऱ्या राम पथ गमनची निर्मिती, नर्मदा नदीच्या संरक्षणासाठी माँ नर्मदा न्यास अधिनियम तयार करणार, नर्मदा परिसरात 1100 कोटी रुपये खर्च करून विश्रामगृहांची उभारणी करणार ही आश्वासने दिली आहेत. याशिवाय रोजगार, शेतकरी आणि सामाजिक सुरक्षेवरही या जाहीरनाम्यात काँग्रेसने जोर दिला आहे.




























































