
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप व आमदार झिशान सिद्दिकी यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. केंद्र सरकारच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या रॅलीमध्ये भाई जगताप यांनी आपल्याला धक्काबुक्की केली आणि माझ्या धर्मावरून आक्षेपार्ह वक्तव्य केले, अशी तक्रार झिशान सिद्दिकी यांनी थेट पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे.
यापूर्वी वांद्रे पूर्व येथील बीकेसीमध्ये मुंबई काँग्रेसने आयोजित केलेल्या टूलकिटच्या वाटपावरून भाई जगताप व झिशान सिद्दिकी यांच्यात वाद झाला होता. आता 14 नोव्हेंबरला मुंबई काँग्रेसने केंद्र सरकारच्या विरोधात आयोजित पदयात्रेच्या निमित्ताने काँग्रेसमधील या दोन नेत्यांमधील वाद पुन्हा उफाळून आला आहे.
काँग्रेसच्या रॅलीत काय झाले…
केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसने 14 तारखेला रॅली आयोजित केली होती. यात भाई जगपात यांनी आपल्याशी गैरवर्तवणूक केली. माझ्या धर्माबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आणि धक्काबुक्की करीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर माझा अपमान केला. पण पक्षाची प्रतिमा अबाधित राखण्यासाठी मी काही वक्तव्य केले नाही. पण भाई जगपात यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी तक्रार आमदार झिशान सिद्दिकी यांनी सोनिया गांधी यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.
राजगृहातील प्रवेशावर निर्बंध
या कार्यक्रमाच्या निमित्ताने चैत्यभूमी ते राजगृह अशी पदयात्रा काढण्यात आली होती. त्या वेळी झिशान सिद्दिकी यांना राजगृहात प्रवेश करू दिला नाही. त्यामुळे संतप्त झालेले झिशान सिद्दिकी पदयात्रा अर्धवट सोडून निघून गेल्याचे सांगण्यात येते. मात्र यावर मुंबई काँग्रेसच्यावतीने स्पष्टीकरणही देण्यात आले. कोरोना निर्बंधामुळे फक्त दहा जणांना राजगृहात प्रवेश करण्याची परवानगी होती. त्यामुळे फक्त ज्येष्ठ नेत्यांना आतमध्ये प्रवेश देण्यात आला.
मागील खेपेस बीकेसीमध्ये काँग्रेसने आयोजित केलेल्या टूलकिट वाटपाच्या कार्यक्रमात मुंबई काँग्रेसने आपल्याला निमंत्रण दिले नव्हते, अशी तक्रार झिशान सिद्दिकी यांनी सोनिया गांधींपासून राहुल गांधी व पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील यांच्याकडे केली होती.































































