वाढत्या महागाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन; आंदोलनात घोडागाडी, टांगा अन् बैलगाडीही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलसह गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. इंधन दरवाढीने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना केंद्र सरकारने सलग दरवाढीचे सत्र सुरू केले आहे. या निषेधार्थ केंद्र सरकारविरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने गाढव, घोडा गाडी, टांगा बैलगाडी आणून आंदोलन करण्यात आले. भाजप सरकारच्या निषेधाच्या आणि धिक्काराच्या घोषणा या वेळी देण्यात आल्या.

पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी आमदार दीप्ती चवधरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर हे आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मोहन जोशी, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, चंदूशेठ कदम, दिपाली डोख, सुनिल शिंदे, अश्विनी लांडगे, स्वाती शिंदे, सौरभ आमराळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी गाढवेदेखील आणण्यात आली होती. इंधन दरवाढीला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

यावेळी बोलताना जगताप म्हणाले. पश्चिम आशिया युध्दामुळे कच्च्या इंधनाचे दर दररोज वाढत आहेत. जागतिक बाजारात इंधनाचे दर कमी असताना पेट्रोल आणि डिझेलवर दररोज एक हजार कोटी रुपयांचा केंद्रीय कर लादूनही भाजप सरकारचे पोट भरलेले नाही. इंधनाचे दर कमी असताना भाजप सरकारने त्याचा लाभ जनतेला मिळवून दिला नाही. जेव्हा पेच प्रसंग उद्भवला तेव्हा भाजपचे नेतृत्व निवडणुकांमध्ये व्यस्त झाले. निवडणुका संपल्यानंतर ते त्यागाचा उपदेश देऊ लागले असून, देशभक्तीच्या नावावर पुन्हा जनतेला वेठीस धरले जात आहे.