
लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आयकर विभागाने काँग्रेसशी संबंधित बँक खाती गोठवली आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी आणि वीज बिल भरण्यासाठीही पैसे नसल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांनी केला. काँग्रेससह युवक काँग्रेसचीही खाती गोठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
अजय माकन पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की, आयकर विभागाने काँग्रेस आणि युवा काँग्रेसची खाती गोठवली आहेत. त्यामुळे आमच्याकडे खर्चासाठीही, वीज भरण्यासाठी, कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी पैसे नाहीत. भारत जोडो न्याय यात्रा, राजकीय कार्यक्रमही यामुळे प्रभावित झाल्याचे ते म्हणाले.
देशातील लोकशाही संपली आहे. दोन दिवसांपूर्वी आम्ही जे चेक जारी केले होते ते क्लिअर झाले नाहीत. चौकशी केली असताना काँग्रेसच आणि युवा काँग्रेसची खाती गोठवल्याची माहिती मिळाली. देशातील लोकशाहीही गोठली आहे. फक्त काँग्रेसची खातीच नाही तर लोकशाहीच गोठली आहे, अशा शब्दात माकन यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
हिंदुस्तान में लोकतंत्र पूरी तरह से खत्म हो चुका है।
देश की मुख्य विपक्षी पार्टी के सारे अकाउंट्स फ्रीज कर दिए गए हैं। भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के अकाउंट पर तालाबंदी कर दी गई है।
ये कांग्रेस पार्टी के अकाउंट्स फ्रीज नहीं हुए, हमारे देश का लोकतंत्र फ्रीज हो गया है।
: कांग्रेस… pic.twitter.com/ndoT5IHKtg
— Congress (@INCIndia) February 16, 2024
दरम्यान, आयकर विभागाने काँग्रेस आणि युवा काँग्रेसशी संबंधित चार बँक खाती गोठवली आहेत. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसला याची माहिती मिळाली. आयकर विभागाने 210 कोटींची वसुली करण्यासाठी ही खाती गोठवली आहेत.
काय आहे प्रकरण?
हे संपूर्ण प्रकरण 2018-19 मधील इन्कम टॅक्स रिटर्नशी संबंधित आहेत. आयकर विभागाला 210 कोटी रुपयाचा दंड वसुल करायचा आहे. यामागे दोन कारणं आहेत. यातील पहिले म्हणजे 31 डिसेंबर 2019 पर्यंत खात्यांसंदर्भातील माहिती आयकर विभागाला द्यायची होती. त्यावेळी काँग्रेसने जवळपास 40-45 दिवस उशिराने रिटर्न भरला होता. दुसरे कारण म्हणजे 2018-19 या निवडणुकीच्या वर्षात काँग्रेसने 199 कोटी रुपये खर्च केले होते. यात 14 लाख 40 हजार रुपये काँग्रेसचे खासदार आणि आमदारांनी आपल्या वेतनातून जमा केले होते. हे पैसे रोख जमा करण्यात आले होते. रोख पैसा जमा झाल्याने आयकर विभागाने काँग्रेसवर 210 कोटींचा दंड ठोठावला.





























































