
कश्मीरात पंडितांची संपूर्ण गावे हत्येच्या भीतीने पलायन करीत आहेत. आता कश्मीर फाइल्सची सोशल मीडियावर प्रसिद्धी करणारे गेले कुठे? कश्मिरी पंडितांच्या या भयाण अवस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजप सरकारच जबाबदार आहे, असा घणाघात पन वेलमधील नवसंकल्प शिबिरात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी केला. दरम्यान, बेरोजगारी आणि महागाईने कळस गाठला असतानाच केंद्रातील भाजप सरकार मात्र देशात उत्सव साजरा करत आहे. देश आयसीयूत गेला असताना उत्सव कसले साजरे करता, असा सवाल एच. के. पाटील यांनी केला.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिराचा शुभारंभ आज शेडुंग येथे झाला. यावेळी मार्गदर्शन करताना एच. के. पाटील यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या कारभाराचा पंचनामा केला. ते म्हणाले, देशात काँग्रेसचे सरकार असताना देशविधायक धोरणांमुळे देशातील 217 कोटी गरीब जनता दारिद्रय़रेषेच्यावर जीवन जगत होती. आता केंद्रातील मोदींच्या भाजप सरकारच्या विघातक धोरणांमुळे देशातील 14 कोटी जनता पुन्हा दारिद्रय़रेषेच्या खाली गेली आहे. देशाची अर्थव्यवस्था आयसीयूत गेली आहे. बेरोजगारी वाढली पण नरेंद्र मोदींचे सरकार धर्माच्या नावाखाली गलिच्छ राजकारण करत असल्याची टीका पाटील यांनी केली.






























































