चंद्रकांत हंडोरे, मेधा कुलकर्णीयांच्यासह सहा जणांचे अर्ज दाखल

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे, भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे, शिंदे गटाचे मिलिंद देवरा आणि अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल या सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
काँग्रेसच्या वतीने चंद्रकांत हंडोरे यांनी राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला. त्याप्रसंगी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेनेचे विधिमंडळ पक्षनेते अजय चौधरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.

भाजपच्या वतीने अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल आणि मिंधे गटाचे मिलिंद देवरा यांनी राज्यसभेसाठी अर्ज भरला.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत हंडोरे यांनी काँग्रेस नेतृत्व आणि राज्यातील काँग्रेस आमदार महाविकास आघाडीतील नेते, प्रमुख यांचे आभार व्यक्त केले. पक्षाने माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला राज्यसभेमध्ये पाठविण्याची तयारी दर्शवली, यामुळे मी आभारी आहे. आपला विजय निश्चित असून राज्यसभेत महाराष्ट्राच्या जनतेची व्यथा मांडून त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न मी करेल, सर्वधर्मसमभाव निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असेल. लोकशाहीमध्ये हार-जीत होत असते. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मी हरलो तरी पक्षाची निष्ठा सोडली नाही, अशा भावना हंडोरे यांनी व्यक्त केल्या.

खासदारकीचा कार्यकाळ शिल्लक असतानाही प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेसाठी अर्ज केला. त्याबद्दल प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पटेल म्हणाले की, राजकीय जीवनात असताना काही ना काही घडामोड करावीच लागते. आपण अर्ज का भरला हे येणाऱया काळात समजेलच असे स्पष्ट करतानाच, आपल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेली जागा आमच्याकडेच राहणार आहे, असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.