इमारत ब्युटीफुल पण काम ड्युटीफुल करा – उपराष्ट्रपती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

पुणे महापालिकेची नवीन इमारत ब्युटीफुल आहे. देशात कुठेही यासारखे अद्वितीय सभागृह मी पाहिले नाही. मात्र, तिथे काम ड्युटीफुल व्हायला हवे. प्रत्येक कामात पारदर्शकता हवी. या सभागृहातून जनहिताचे चांगले निर्णय व्हावे आणि सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न व्हावा. सुदृढ लोकशाहीसाठी पारदर्शी आणि जबाबदारीपूर्ण कामकाज व्हावे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले.

महापालिकेच्या नव्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन नायडू यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, स्थायी समिती अध्यक्ष जगदीश मुळीक, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, आयुक्त सौरभ राव आदी उपस्थित होते.

नायडू म्हणाले, पुण्याबद्दल फार आदर आहे. मंत्री असताना या सिटीसाठी बरेच काम करता आले. कर्जरोखे काढणारे हे देशातील पहिले शहर आहे. सिटी क्लीन, ग्रीन, सिटीझन प्रेंâडली व्हायला हवी. त्यासाठी अतिक्रमणे काढली पाहिजेत. कामाला गती मिळायला हवी. सभागृह शोभेचे राहता कामा नये, तर तिथे चर्चा होऊन, विचारविनिमय होऊन बहुमताने निर्णय व्हावेत. शहर सुंदर करायचे तर त्यासाठी काम करायला हवे, असे स्पष्टपणे सांगून नायडू म्हणाले, पदपथ सुरक्षित पाहिजेत. आरोग्यासाठी सायकल आवश्यक आहे. त्यासाठी सायकल ट्रॅक तयार करायला हवेत. अतिक्रमणे काढली पाहिजेत. त्यात राजकीय हस्तक्षेप असता कामा नये. पुण्याचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला आहे. यातील सर्व योजनांच्या कामात पारदर्शीपणा आणि उत्तरदायित्व जोपासले जावे. नागरिकांना प्राथमिक गरजा उपलब्ध करून देतानाच ऑनलाइन सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला जावा. महापालिकेने नागरिकांच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने हे सभागृह आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभार चालवताना नेहमीच रयतेचा विचार केला. सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून सर्व घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांचे विचार व आचार अंमलात आणून या सभागृहातून कामकाज चालावे. पुण्यात मेट्रो असेल, एअरपोर्ट असेल, रिंगरोड असेल या नव्या योजनांच्या माध्यमातून पुणे शहराला नवे आयाम देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट यांचीही भाषणे झाली. महापौर मुक्ता टिळक यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले. उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी आभार मानले.