रत्न बोटात घालूनही लग्न जुळेना, खोट्या आश्वासनांमुळे सराफाला सव्वा लाखांचा दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रतिनिधीक

सामना ऑनलाईन । मुंबई

‘अमुक एक रत्न बोटात धारण करा आणि चमत्कार बघा’ अशा आशयाच्या जाहिराती आपल्यासाठी काही नवीन नाहीत. आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी कित्येक जण अशी रत्न बोटात घालतात. मात्र, असं ‘खात्रीशीर’ फायदा देणारं रत्न बोटात घालूनही फायदा न झाल्याने एका ग्राहकाने सराफाला कोर्टात खेचलं आहे. कोर्टानेही ग्राहकाच्या बाजूने निकाल देत सराफाला 1.3 लाखांचा दंड ठोठावला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, लोअर परळ येथील सुवर्णस्पर्श जेम्स अँड ज्वेलरी या दुकानात एका ग्राहकाने ऑक्टोबर 2015मध्ये हिरा आणि पाचू खरेदी केले होते. ग्राहकाचा विवाह ठरत नसलेल्या एका माणसाने दुकानाची जाहिरात वाचून दुकानाशी संपर्क साधला होता. या सराफाने एका महिन्यात हमखास यशाची खात्री दिली होती. तसं न झाल्यासं 30 दिवसांत पैसे परत करण्याची अटही दुकानाच्या बिलावर होती. त्यामुळे त्या अटीवर विश्वास ठेवत ग्राहकाने सुवर्णस्पर्शमधून एक मौल्यवान हिरा आणि पाचू खरेदी केले होते. त्याने ती रत्नं धारण करूनही पहिल्या महिन्यात कोणताही बदल घडला नाही. त्यामुळे त्याने सराफाशी संपर्क साधला आणि त्याबाबत तक्रार केली होती. पण, एखाद्या वेळी असं होऊ शकतं असं सांगत अजून दोन महिने वाट पाहायला सांगितली.

त्यानंतर ग्राहकाने जवळपास सहा महिने वाट पाहूनही त्याचं लग्न जुळलं नाही. त्यानंतर मात्र, सराफाने आपली फसवणूक केल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि त्याने ग्राहक मंचाकडे तक्रार केली. ग्राहक मंचाकडे या प्रकरणाची सुनावणी होत असताना सुवर्णस्पर्शने आपण असा कोणताही वायदा केला नसल्याचा युक्तिवाद केला. मात्र, ग्राहकाकडे या व्यवहाराचं जे बिल होतं, त्यावरही रत्नांचा गुण न आल्यास 30 दिवसांमध्ये पैसे परत देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार अशक्य गोष्टी पूर्ण होण्याचं आमिष दाखवत ग्राहकाला फसवण्यासाठी ग्राहक मंचाने सुवर्णस्पर्शला सुमारे 1.3 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.