संकट संपेना, ‘एक्सबीबी-1.5’ आला; अतिधोकादायक कोरोना व्हेरिएंटची गुजरातमध्ये एंट्री

कोरोनाचा कहर सुरू असलेल्या देशातून मुंबईत आलेले तीन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने ‘धोक्याचा इशारा’ मिळाला असताना आता अमेरिकेत सर्वाधिक वेगाने प्रसार होणारा कोरोना व्हेरिएंट ‘एक्सबीबी 1.5’ देशात घुसला आहे. मागील व्हेरिएंटपेक्षा तब्बल 120 पटीने पसरणाऱया या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण गुजरातमध्ये आढळला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना वाढणार का, अशी भीती निर्माण झाली आहे.

कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट माणसाच्या रोगप्रतिकारशक्तीला भेदून आपला प्रभाव दाखवतो, असे अमेरिकेचे आरोग्यतज्ञ एरिक फिगेल डिंग यांनी सांगितले आहे. ‘एक्सबीबी-1.5’ हा कोरोनाचा सुपर प्रकार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अमेरिकेप्रमाणे चीनही या नवीन व्हेरिएंटचा डाटा लपवत असल्याचा आरोप केला आहे. तर डिसेंबरमध्ये या व्हेरिएंटची एक टक्क्याच्या तुलनेत तब्बल 40 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अमेरिकेत वाढलेला कोरोना याच व्हेरिएंटचा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

असा आहे धोका

  • रोगप्रतिकारशक्तीला चकावा देणारा सर्वाधिक वेगाने पसरणारा
  • मानवाच्या पेशींवर सर्वाधिक वेगाने हल्ला करणारा व्हेरिएंट
  • ओमायक्रोनच्या एक्सबीबी आणि बीक्यू व्हेरिएंटपेक्षा वेगाने प्रसार
  • याच्या लागणीमुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण सर्वाधिक

 मुंबईत कोरोनाचे दोन रुग्ण

मुंबईत गेल्या 24 तासांत करण्यात आलेल्या 2 हजार 612 चाचण्यांमध्ये कोरोनाचे केवळ दोन रुग्ण आढळले आहेत. यातील एकालाही रुग्णालयात दाखल करावे लागले नाही, तर दिवसभरात कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झालेला नाही. दरम्यान, एकाच दिवसात दहा जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोना 40 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.