कोरोना मृतांच्या वारसांना 50 हजारांची मदत, सुनावणी घेऊन प्रकरणे काढणार निकाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना शासनाकडून 50 हजारांचे अनुदान देण्यात येत असून, यासाठी शहर व जिह्यातून मृतांच्या नातेवाईकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. सध्या प्राप्त होणाऱया अर्जांवर घेण्यात येणाऱया निर्णयाचे कामकाज तांत्रिक कारणांमुळे ठप्प झाले होते. आता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे 8 ते 10 फेब्रुवारी असे तीन दिवस सुनावणी घेऊन ही प्रकरणे निकाली काढणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मृताच्या वारसदारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासन स्तरावर याची कार्यवाही सुरू होती. सोलापूर शहर व जिह्यातून 11630 अर्ज दाखल झाले आहेत. यातील 4978 अर्जांना मंजुरी मिळाली आहे. 3200 अर्ज इतर जिह्यातील असल्याने वर्ग करण्यात आले आहेत. 714 अर्ज मंजूर करण्यात आले होते. 353 जणांनी पुन्हा अर्ज करत मदतीची मागणी केली होती. त्यामध्ये सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील 163, तर 190 अर्ज जिह्यातील आहेत. ही प्रकरणे निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी 8 ते 10 फेब्रुवारी असे तीन दिवस या प्रकरणाची तपासणी करून सुनावणी घेणार आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी दिली.

काही अर्ज प्रलंबित, काही परजिह्यातील, काही अर्ज बोगस असून, काही अर्जांत तांत्रिक चुका असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा अर्जांवर निर्णय घेण्यात आलेला नाही. एका प्रकरणात तर एकाच कुटुंबातील तिघा वारसदारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे प्रशासनासमोरही अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्रुटी आढळलेले सुमारे सात हजारांहून अधिक अर्ज प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. अशा त्रुटी आढळलेल्या नागरिकांना त्रुटींची पूर्तता करून पुन्हा अर्ज करण्यास सांगितले होते. त्यानुसार प्राप्त झालेल्या अर्जांची आता सुनावणी घेतली जाणार आहे.