मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा रद्दची बातमी खोटी, परीक्षा पुढे ढकलली!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Exams
प्रातिनिधिक फोटो

आज मराठीतील एका दैनिकाच्या जुन्या बातमीचे संपादन करून “मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा रद्द होऊन सर्वांना पुढील वर्गात प्रवेश”अशी चुकीची बातमी समाजमाध्यमावर आली आहे. सदरची बातमी खोटी असून राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या 2020 च्या उन्हाळी सत्राच्या सर्व परीक्षा रद्द झालेल्या नसून त्या 31 मार्च 2020 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध मराठीतील दैनिकाच्या दि. 18 मार्चच्या गोव्याच्या पणजी आवृत्तीत “पहिलीपासून ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द” अशी गोवा सरकारने घेतलेल्या निर्णयाची बातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीचे संपादन करून ” पहिलीपासून ते पंधरावी पर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द व मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा रद्द होऊन सर्वांना पुढील वर्गात प्रवेश”अशी चुकीची बातमी समाजमाध्यमावर आली.

मुंबई विद्यापीठाने शासनाच्या निर्देशानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दि. 23 मार्च 2020 पासून होणाऱ्या सर्व परीक्षा 31 मार्च 2020 पर्यंत पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. तशा आशयाच्या परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर टाकण्यात आलेले आहे. या परीक्षा रद्द झालेल्या नाहीत तर पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. विद्यापीठ परीक्षा व इतर महत्वाच्या सूचना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर तात्काळ प्रसिद्ध करीत असते. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. समाजमाध्यमावरील अशा चुकीच्या बातम्या दुसऱ्यास पाठवू नयेत. शासनाच्या निर्देशानुसार परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर केल्या जातील. त्या तारखा विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जातील असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी अशा चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नये, हे दिवस विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचे असून या कालावधीत त्यांनी घरात बसून अभ्यास करावा, कुटुंबीयांसोबत वेळ व्यतीत करावा, युट्युबच्या माध्यमातून अभ्यास करावा,अभ्यासाच्या काही समस्या असतील तर आपल्या शिक्षकांना समाजमाध्यमाच्या माध्यमातून संपर्क साधून त्या सोडवाव्यात तर काही वेळ आपला छंद जोपासावा. मिळालेल्या या बहुमूल्य वेळेचा आपण सदुपयोग करावा.

– डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरु, मुंबई विद्यापीठ