कोरोना होऊन गेलेल्या तरुणाला हृदयविकार जडला, शस्त्रक्रियेमुळे मिळाले जीवदान

अजय सावंत (बदलेले नाव) नावाच्या 40 वर्षांच्या तरुणाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला होता. खासकरून पायऱ्या चढ-उतार करताना त्याला थाप  लागण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले होते.त्यांना होणाऱ्या त्रासाचे मूळ शोधण्यासाठी काही चाचण्या करण्यात आल्या. यात त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या डाव्या बाजूच्या धमनीमध्ये ब्लॉकेजेस असल्याचे दिसून आले. अजय यांचा वैद्यकीय इतिहास तपासला असता त्याला  सप्टेंबर 2020 मध्ये कोविड-19 झाला होता आणि त्याने कोविडच्या लसीचे 3 डोसही  घेतले होते.

अजय यांच्या तपासणीमध्ये त्यांच्या हृदयाला गरजेपेक्षा कमी रक्तपुरवठा होत असल्याचं दिसून आलं होतं. यामुळे रुग्णावर आणखी काही चाचण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अजय यांच्यावर  26 एप्रिल 2023  रोजी अँजिओग्राफी करण्यात आली होती ज्यात हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या डाव्या बाजूच्या धमनीमध्ये ब्लॉकेजेस दिसून आले. ब्लॉकेजेस दूर करण्यासाठी अँजिओप्लास्टी करण्यात आली. 28 एप्रिल 2023 रोजी रुग्णाच्या प्रकृतीत बरीच सुधारणा दिसून आली होती ज्यामुळे त्याला सामान्य वॉर्डमध्ये हलविण्यात आले होते.

मुंबईतील वोक्हार्ट रुग्णालयाचे हृदयविकार शल्यचिकीत्सक डॉ.परीन संगोई यांनी अजय यांच्यावर उपचार केले होते. त्यांने म्हटले आहे की, “हृदयविकाराची समस्या घेऊन आलेल्या या तरुण रुग्णावर उपचार करणं काहीसं आव्हानात्मक होतं. स्ट्रेस टेस्ट पॉझिटीव्ह आली होती आणि हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमनीमध्ये ब्लॉकेजेस होते. त्यात भर म्हणजे रुग्णाला पूर्वी कोविड झाला होता आणि त्याने त्यासाठीच्या लसीही घेतल्या होत्या, ज्यामुळे ही केस काहीशी गुंतागुंतीची झाली होती. वेळेतच अँजिओप्लास्टी झाल्याने रुग्णाच्या जीवाला असलेला धोका टळला. “