
कोरोना विषाणूमुळे आज सगळ्या जगाची परिस्थिती गंभीर झाली आहे. व्यवसायही ठप्प झाले आहेत. अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
अर्थात अनेकजण या परिस्थितीचा सामना मोठ्या हिमतीने करत आहेत. याचं एक उदाहरण मलेशियात पाहायला मिळत आहे. कधीकाळी पायलट म्हणून काम करणारा तरुण आता रस्त्यावर फूड स्टॉल चालवत आहे.
या तरुणाचं नाव अझरीन मोहम्मद जववी असं आहे. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर इथे राहणारा अझरीन पूर्वी विमान उडवत असे. मलिंडो एअर नावाच्या विमान कंपनीत तो नोकरी करत होता. कोरोना लॉक डाऊनमुळे त्याची नोकरी गेली.
पदरात चार मुलं असलेल्या अझरीनला आता पोटापाण्याची चिंता सतावू लागली. अखेर त्याने एक निर्णय घेतला. त्याने थोड्याशा भांडवलातून एक फूड स्टॉल टाकला आणि त्याला नाव दिलं कॅप्टन कॉर्नर.
या स्टॉलवर तो मलेशियन अन्नपदार्थ स्वतः बनवून विकतो. त्याची स्टॉल चालवायची पद्धत अनेक लोकांना आकर्षित करते. तो सकाळी आपला पायलटचा गणवेश घालतो आणि आपल्या स्टॉलवर येतो.
तिथेही दिवसभर तो गणवेशात काम करतो. त्याच्या हातची चव चाखायला रोज लोक येतात आणि त्याच्यासोबत फोटो काढतात.
आपल्या चार मुलांसाठी हा निर्णय घेतला असल्याचं तो सांगतो. आयुष्यात कधी ही हार मानू नका, असा संदेश ही तो लोकांना देतो.
























































