
कोरोनाची लक्षणे, त्याबाबतचे उपचार आणि कोरोनासंबधित माहिती जनतेला देण्यात येत आहे. तसेच याबाबत जनजागृतीही करण्यात येत आहे. मात्र, काहीजणांमध्ये अजूनही कोरोनाची भीती असल्याने ते आजार झाल्याचे लपवत आहे. कोरोना झाल्याचे लपवल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना जळकोटमध्ये घडली आहे.जळकोट तालुक्यातील तिरुका येथील एका तरुणाने कोरोनाची लागण झाल्याचे लपवून ठेवले. तसेच कोरोनाचे उपचारही घेतले नाहीत. त्यामुळे त्याची प्रकृती खालावली. त्यानंतर उपचारासाठी उदगीरला नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. कोरोनाबाधित तरुणावर जळकोट येथे नगर पंचायतीच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.
जळकोट तालुक्यातील तिरुका येथील एका तरुणाला कोरोनाची लागण होऊनही त्याने कोरोना चाचणी केली नाही. 7 ते 8 दिवस त्याने आजार अंगावर काढल्याने प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळे उपचारासाठी उदगीरला नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जळकोट येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. शववविच्छेदनापूर्वी कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी मृत तरुण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. कोरोनामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचेही स्पष्ट झाले. कोरोनामुळे मृत्यू झाल्याने शवविच्छेदन न करता अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नगर पंचायतीकडे सुपूर्द करण्यात आला. नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने मृतदेहावर शहरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

























































