शाळांसाठी लवकरच कोरोना प्रतिबंधक नियमावली, नियमांचे पालन बंधनकारक;  शाळा 13 जूनपासून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांसाठी कोरोना प्रतिबंधक नियमावली तयार करण्यात येत असून शाळांना या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. विदर्भ वगळता राज्यातील इतर शाळा 13 जूनपासूनच सुरू होतील, अशी माहिती माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली.

राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय आहे. असे असले तरी सद्य परिस्थितीत शाळा ऑनलाईन सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. राज्य सरकारच्या परवानगीनंतरच 13 जूनपासून शाळा सुरू होणार असल्याचेही पालकर म्हणाले. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षेला शिक्षण विभागाचे प्राधान्य असून त्यामुळे शाळांकरीता यापूर्वी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे शाळांनी पालन करावे, असेही पालकर यांनी स्पष्ट केले.

शालेय शिक्षण विभाग सध्या तरी शाळा सुरू करण्यावर ठाम आहे. कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन वेळोवेळी च्या परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.